दोंडाईचा । राष्ट्रीय महामार्ग क्र ३ मुंबई आग्रा महामार्ग सोनगीर पासून ते दोंडाईचा नंदुरबार विसरवाडी म्हणजे नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्ग क्र.६ ला जोडणार्या ११२ किमी लांबीच्या रस्त्यावर लवकरच चौपदरीकरण होणार असल्याची माहिती रोहयो व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या आदेशानुसार या कामास नुकतीच मंजुरी प्राप्त झाली आहे. सोनगीर दोंडाईचा नंदुरबार विसरवाडी या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर अवजड वाहतूक होती, रस्ता अरुंद असल्याने अनेकदा अपघात देखील होत होते त्यामुळे सदर रस्त्याचे चौपदरीकरण करून राष्ट्रीय महामार्ग करण्याची मागणी मंत्री जयकुमार रावल यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे अनेक दिवसांपासून केली होती. याबाबत दिल्लीत अनेकदा बैठका झाल्या त्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी सादरीकरण करून हा रस्ता चौपदरीकरण करणे गरजेचे असल्याचे पटवून दिले.