१२ दिवसांपूर्वीच इशारा, आता तरी स्वयंशिस्त पाळा!

0

जळगाव – जळगाव शहरातील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असल्याचे काल (दि.२८) निष्पन्न होताच सर्वत्र खळबळ उडाली आहे. मात्र, १२ दिवसांपूर्वीच आयएमएच्या जळगाव शाखेचे सचिव डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी याबाबत जनशक्तिच्या माध्यमातून स्पष्ट इशारा दिला होता. तो खरा ठरला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १७ मार्चला जनशक्तिशी संवाद साधताना ‘नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी; तिसरा, चौथा टप्पा परवडणारा नाही’, असे कळकळीचे आवाहन डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी केले होते. आजही त्यांनी तेच पुनर्आवाहन केले आहे. ते म्हणाले की, नागरिकांनी काही बंधने स्वतःहून पाळायला हवीत, प्रशासनाचे ऐकायला हवे. कोरोनाला रोखण्यात केंद्र व राज्य सरकार आपल्या पातळीवर अनेक प्रयत्न करत आहे. ते यशस्वी होण्यासाठी त्यामध्ये नागरिकांचा स्वयंस्फूर्त सहभाग आणि १०० टक्के प्रतिसाद हा तेवढाच महत्त्वाचा आहे. सद्यस्थितीत जळगावमध्ये एक रुग्ण सापडला असला, तरी ही संख्या एवढीच मर्यादित राहायला हवी. त्यासाठी प्रत्यकाने खारीचा वाटा उचलणे गरजेचे आहे. सीमाबंदी, सोशल डिस्टन्सिंग, लॉकडाऊनचे नियम याचे पालन काटेकोरपणे केले पाहिजे. दुर्दैवाने याकडे काहीजण डोळेझाक करत आहेत. अशांनी आता तरी स्वतःहून ही सर्व बंधने पाळण्यास सुरुवात करावी. झोपडपट्टीसारख्या दाट लोकवस्तीच्या भागात कोरोनाचा उद्रेक होण्याची भीती अधिक आहे. त्यामुळे या भागातील रहिवाशांनीही अधिक सजग राहिले पाहिजे.

एक छोटीशी बेफिकिरी संकटात लोटेल

एक छोटीशी बेफिकिरी आपल्याला दुसऱ्या टप्प्यातून तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्याकडे घेऊन जाऊ शकते आणि अशावेळी परिस्थिती मोठी कठीण होईल. रुग्ण असतील पण त्यांच्यावर उपचार करायला डॉक्टर मिळणार नाहीत. जळगावमध्ये कोरोनाचा रुग्ण निष्पन्न झाला. तो सिव्हीलमध्ये दाखल होण्यापूर्वी ज्या डॉक्टरांकडे गेला होता, त्यांनाच क्वारंटाईन व्हावे लागले आहे. त्यामुळे पुढील काही दिवस हे डॉक्टर रुग्णांसाठी उपलब्ध नसतील. अशा तऱ्हेने डॉक्टर क्वारंटाईन होण्याची साखळी जर विस्तारत गेली तर काय होईल याचा विचार प्रत्येकाने करावा, असा इशाराही डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी दिला आहे.


लपवू नका, प्रशासनाला सांगा

सक्तीने घरात थांबून राहा, शेजाऱ्यांकडेही जाऊ नका, ट्रॅव्हल हिस्ट्री असेल तर ती न लपवता प्रशासनाला सांगा, काही लक्षणे दिसत असतील तर लागलीच सिव्हीलमध्ये जाऊन तपासणी करून घ्या, अशा सूचनाही डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी केल्या आहेत.