उल्हासनगर : आपल्या मुलाला दिर्घायुष्य लाभो व त्याच्या सुखशांतीकरीता आई घरात पुजा करीत असताना दुस-या खोलीत तिच्या १२ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दु:खद घटना उल्हासनगरात घडली आहे.
मिळालेल्या माहितीनूसार कॅम्प नं. ३ येथील शांतीनगर परिसरात बॅरेग नं. १२०१ समोर संदीप शुकला हे आपल्या कुटूंबासह राहतात. त्यांना श्रवण(१२) व सर्वेश(१०) ही दोन मुले असून श्रवण हा इयत्ता सातवीत शिकत होता. तो मोठा मुलगा असल्यामुळे रविवारी छटपुजा निमित्त संदीप यांच्या पत्नीने मुलाच्या दिर्घायुष्यासाठी व त्याच्या सुखशांतीकरीता व्रत केले होते. दुपारी १२ च्या सुमारास घरातील एका खोलीमध्ये आई पुष्पा ही पुजासाठी बसली होती. तर दुस-या खोलीत श्रवण हा टिव्ही पाहत होता. त्याने अचानक त्या खोलीचा दरवाजा आतून बंद करून घरातील लोखंडी अँगलला साडीच्या सहाय्याने गळफास घेतला. हा प्रकार उघडकीस आल्यावर त्याच्या नातेवाईकांनी त्याठिकाणी धाव घेऊन त्याला उपचारासाठी मध्यवर्ती रूग्णालयात नेले. पण डॉक्टरांनी त्याला तपासून तो मयत झाल्याचे घोषीत केले. श्रवण या विद्यार्थ्याने आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप समजले नसून याप्रकरणी मध्यवर्ती पोलिस ठाण्यात आकस्मत मृत्यूची नोंद दाखल करण्यात आली आहे. श्रवण याचे वडिल संदीप यांचा पळसाची पाने विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांच्या मुलाने आत्महत्या केल्यामुळे शुकला कुटूंबामध्ये शोककुळाचे वातावरण पसरले आहे.