नवी दिल्ली: १७ व्या लोकसभेच्या अंतिम टप्प्यातील मतदान येत्या १९ रोजी होणार आहे. शेवटचा टप्प्या शिल्लक असल्याने सर्वच राजकीय पक्ष जोरदार प्रचाराला लागले आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी पुन्हा एकदा विरोधकांवर निशाना साधला आहे. तुमचा हा प्रधानसेवक गेल्या पाच वर्षापासून पंतप्रधान आहे, परंतु एक क्षण देखील मी स्वत:चा विचार करत नाही. माझा स्वत:चा परिवार नाही किंवा नातेवाईकही नाही. संपूर्ण देश आणि देशातील १३० कोटी जनता माझा परिवार आहे असे पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा जनतेला भावनिक साद घातली आहे. ट्वीटरवरून भाजपने मोदींचे विधान प्रसिद्ध केले आहे.
मोदींनी ट्वीटरवरून महाघाडीला लक्ष केले आहे. महाआघाडी नुसती व्होट बँकेचे राजकारण करत असते. फक्त मतांसाठी त्यांना गरिबांची आठवण येत असते असा टोला मोदींनी लगावला आहे. या देशातील गरिब जे यातना भोगत आहे, त्यातून मी निघालेलो असल्याने गरिबांचे दु:ख मला माहित आहे. गरिबांची जी जात आहे तीच जात माझी आहे असे मोदींनी सांगितले आहे.
पुन्हा एकदा मोदी सरकार येणार हे निश्चित
लोकसभा निवडणुकीचा निकाल काय लागणार याची केवळ औपचारिकता बाकी आहे. पुन्हा एकदा मोदी सरकार येणार हे निश्चित असल्याचा दावा मोदींनी केला आहे.