१४० हुतात्म्यांच्या कुटुंबीयांना मदत

0

हडपसर । हुतात्मा सौरभ फराटे यांच्या कुटुंबीयांचे पत्राद्वारे सांत्वन केले होते. मात्र, प्रत्यक्ष भेटून त्यांच्याशी संवाद साधण्याची इच्छा होती, असे मत गुजरातमधील दहावी इयत्तेत शिकणार्‍या विधी जाधव या मुलीने व्यक्त केले. गुजरातमधील नडियाद येथील तहसीलदार राजेंद्र जाधव यांची विधी मुलगी आहे.

फुरसुंगी येथे हुतात्मा सौरभ फराटे यांच्या कुटुंबीयांचे जाधव कुटुंबीयांनी भेट घेतली. याप्रसंगी गुजरातमधील नडियाडचे तहसीलदार राजेंद्र जाधव, त्यांची मुलगी विधी, पत्नी, मंगल फराटे, नंदकुमार फराटे, रोहित फराटे, प्रशांत सुरसे, पल्लवी सुरसे, गणेश जगताप, हरिश शेलार, सचिन नेमकर आदी उपस्थित होते.

अहमदनगरमधील हुतात्मा संदीप ठोक यांच्या स्मारकाचे उद्घाटनासाठी जाधव कुटुंबीय आले होते. तेथील कार्यक्रम झाल्यानंतर त्यांनी फुरसुंगी येथे फराटे कुटुंबीयांची भेट घेतली. या वेळी विधी म्हणाली की, मी सहावीमध्ये शिकत असताना दूरचित्रवाणीवर हुतात्मा झालेली मुलगी रडताना पाहिली. त्या वेळी वडिलांना त्याविषयी विचारून जाणून घेतले आणि मला त्यांचे अश्रू पुसून त्यांना मदत करायची आहे, असे सांगितले. तेव्हापासून आजपर्यंत लोकांकडून मिळालेल्या पैशांतून १४० हुतात्म्यांच्या कुटुंबीयांना पाच हजार रुपये आणि सांत्वन पत्र दिले आहे. मंगल फराटे म्हणाल्या, राजकारण्यांनी येऊन सांत्वन केले. सौरभचे स्मारक करतो असे आश्वासन दिले. मात्र, अद्यापपर्यंत काहीही केले नाही, याचे दु:ख वाटते.