जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्न जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील अनुदानित व विनाअनुदानित तब्बल १५० महाविद्यालये राजर्षी छत्रपती शाहु महाराज शिक्षण शुक्ल शिष्यवृत्ती योजनेत पात्र ठरली आहे़ मात्र, त्यातील १३० महाविद्यालयांनी महाडिबीटी पोर्टलवर शिष्यवृत्तीसाठी अद्ययावत माहिती भरलेली आहे. तर २० महाविद्यालयांनी अद्याप माहिती भरलेली नसल्याची माहिती समोर आली आहे.
राषर्षी छत्रपती शाहु महाराज शिष्यवृत्ती योजना व डॉ़ पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता शिष्यवृत्ती योजना उच्च शिक्षण विभागाकडून सुरू करण्यात आली आहे़ यात पालकांचे ८ लाखाच्या खाली उत्पन्न असलेले विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात़ यासाठी उच्च शिक्षण विभागातर्फे महाविद्यालयांना लॉगिन आयडी व पासवर्ड सुध्द देण्यात आले होते़ त्यामुळे मुदतीच्या आत महाविद्यालयांनी महाडिबीटी पोर्टलवर आपल्या महाविद्यालयाचे प्रोफाईल अपडेट करणे अत्यावश्य होते़ त्यानुसार खान्देशातील १५० महाविद्यालयांपैकी ८३ अनुदानीत तर ४७ विनाअनुदानित महाविद्यालयांनी माहिती भरली आहेत़ तर अद्याप २० महाविद्ययांनी अजूनही प्रोफाईल अपडेट केलेले नाही.