१५ दिवसांत ४० गोदामे करणार सील,१९३ गोदामांना नोटीसा

0

भिवंडी – तालुक्यातील गोदाम नगरीत मोठ्या प्रमाणावर ज्वलनशील रसायनांचा अनधिकृतपणे साठा असलेल्या गोदामांची संख्या मोठी आहे. या गोदामांना अज्ञात कारणास्तव वरचेवर आगी लागुन जीवीत आणि वित्तहानी बरोबर स्थानिक रहिवाशांच्या सार्वजनिक आरोग्याला गंभीर धोका निर्माण झालेला आहे. अनेक वर्षांपासून रासायनिक गोदामांसाठी स्वतंत्र उभारणी केली जावी अशी मागणी असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. पर्यावरण मंत्र्यांनी कारवाई करण्याचे निर्देश दिल्या नंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने गंभीर दखल घेत येत्या 15 दिवसांत 40 गोदामे सिल केली जाणार आहेत तसेच 193 गोदाम मालकांना नोटीसा पाठवुन त्यांच्या जवळ असलेली कायदेशीर कागदपत्रे जमा करण्यास सांगण्यात आलेले आहे. गोदाम मालकांकडे योग्य त्या विभागाच्या परवानग्या नसल्यास त्यांच्यावर कारवाई बरोबर गुन्हेही दाखल केले जातील अशी माहिती उपविभागीय अधिकारी डॉ. संतोष थिटे यांनी पत्रकारांना दिली.

ज्वलनशील रासायनिक साठ्यांना आगी लागतात सदर आगीतुन निघणार्‍या विषारी धुरामुळे स्थानिक रहिवाशी त्रस्त झालेले आहेत. काल्हेर, दापोडा, गुंदवली, वळ, पुर्णा, कोपर, राहनाळ वगैरे अनेक ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात अनधिकृत गोदामे आहेत. अशा गोदाम चालकांविरूद्ध कारवाईची मागणी केली जाते पण संबंधित विभागाकडून दुर्लक्ष केले जाते. सध्या शासनाने उचललेल्या कारवाईच्या बडग्यामुळे गोदाम चालक व मालक भयभीत झालेले आहेत. औद्योगीक सुरक्षा विभाग, प्रदुषण नियंत्रण मंडळ, भिवंडी अग्नीशमन दल आदिंच्या प्रतिनिधींना बैठकीसाठी आमंत्रित करून गोदाम चालक मालकांनी कायदेशीर कागदपत्रे 15 दिवसांत जमा करण्याची मुदत दिली आहे. कागदपत्रे मुदतीत जमा न केल्यास कठोर कारवाई केली जाईल असाही इशारा देण्यांत आला.