७० लाखांच्या निधी मंजुरीसोबतच भूमिपूजन होऊनही काम रखडलेलेच; मोठ्या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता
नवीन पाटील – सफाळे । सफाळे पश्चिमेकडील तिघरे-अंबोडे-दांडाखाडी-खटाळी-मधुकरनगर गावातील रस्त्यांची गेल्या १५ वर्षांपासून दूरवस्था झाली असून संबंधित शासकीय अधिकारी नागरिकांच्या मागणीनंतरही सदर रस्त्यांची डागडुजी करण्यास उदासीनता दाखवत आहेत. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ७० लाखांचा निधी मंजूर होऊन स्थानिक आमदारांनी ४ मार्च २०१७ रोजी या रस्त्यांचे भूमिपूजन केले. मात्र अद्याप पर्यंत रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झालेली नाही. तर दुसरीकडे मुसळधार पावसामुळे रस्त्यावर उरली सुरली डांबर आणि मातीही धुवून गेल्याने रस्त्याची पूर्णतः चाळण झाली आहे. यामुळे स्थानिक ग्रामस्थांसह वाहनचालकांना तारेवरची कसरत करून रोजचा प्रवास करावा लागत असून रस्त्यातील खड्ड्यांमुळे अपघाताच्याही घटना घडत आहेत.पश्चिमेकडील तिघरे-अंबोडे-दांडाखाडी-खटाळी-मधुकरनगर गावातील अशा एकूण २ किलोमीटरच्या वाहतुकीच्या रस्त्याची अक्षरश चाळण झाली आहे. काही वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने निधी कमी पडल्याने प्रस्तावित असलेल्या सोळाशे मीटरच्या रस्त्यापैकी बाराशे मीटरच्या रस्त्याची दुरुस्ती केली होती. मात्र त्यानंतर आजतागत पुन्हा येथील उर्वरित दुरुस्ती झालीच नाही. या रस्त्यावरून अनेक वाहनचालक, दूध व भाजीविक्रेते तसेच विद्यार्थी दररोज प्रवास करीत असतात. मुंबईसारख्या ठिकाणी कामानिमित्त जाणारे अनेक नोकरदारवर्ग रात्रीच्या वेळी याच रस्त्यावरून कशीबशी वाट काढत घरी पोहोचतात. तर रात्रीच्या अंधारात खड्डे चुकवताना अनेकदा अपघातही घडून येतात.
मुसळधार पावसात पूल पाण्याखाली जाऊन वाहतूक व्यवस्था कोलमडल्याच्या घटना
या भागातील अनेक गोरगरीब नागरिक शेतीवाडी करून त्यांची विक्री करण्यास पहाटे अडीच वाजल्यापासून प्रवास करतात. मात्र, खराब रस्त्यापायी पायी चालत जाऊन नाक्यावरील एसटी बस पकडणेही जिकरीचे होते. गावात आजारी व्यक्ती तसेच गर्भवती महिलांना हॉस्पिटलमध्ये नेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून अनेकदा वाहनातच प्रसूत होतात.
गावात जवळपास प्राथमिक आरोग्य केंद्र नसल्याने रात्रीच्या सुमारास साप, विंचू सारखे विषारी जनावरे चावल्यास १२ ते १५ किलोमीटर प्रवास करून जावे लागते. रस्त्यालगतच्या अनेक ठिकाणच्या मोर्याची उंची कमी असल्याने मुसळधार पावसात पूल पाण्याखाली जाऊन वाहतूक व्यवस्था कोलमडल्याच्या घटना यावर्षीही अनेकदा घडल्या. त्यामुळे नोकरदारवर्ग, विद्यार्थी, भाजीविक्रेते यांचे बेहद हाल झाले.
गावातील रस्ता हा अत्यंत वाईट स्थितीत आहे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे आजारी व गरोदर स्त्रियांना दवाखान्यात दाखल करण्यात मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती करावी. दिलेश विजय पाटील, रहिवासी (खटाळी)
‘जीएसटी’ लागू झाल्यामुळे नव्याने टेंडर घेण्यास काही तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याने टेंडर घेण्यास कोणी पुढाकार घेत नाहीत. यामुळे ठाणे व पालघर जिल्ह्यातील ५० कोटींची कामे रखडलेली असून यासंदर्भात ठाण्यात एक बैठक झाली. सदर रस्त्यासाठी निधी मंजूर झाला असून त्याच्या दुरुस्तीसाठी सर्वेतोपरी प्रयत्न करीन. दामोदर पाटील, आरोग्य व बांधकाम सभापती, पालघर जिल्हा परिषद
खड्ड्यांबाबत शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी उदासीन
खड्डेमय रस्त्यांमुळे वाहनांच्या दुरुस्तीचा प्रश्नही वाढू लागला आहे. हा रस्ता जिल्हा परिषद बांधकाम विभागांतर्गत येतो. मात्र, वर्षोनुवर्षे उलटूनही रस्त्याच्या डागडुजीकडे गांभीर्याने पहिले जात नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी अनेकदा श्रमदानातून रस्त्यातील खड्डे बुजवण्यास पुढाकारही घेतला होता. येथील नागरिकांना केळवे पर्यटन क्षेत्राकडे व पालघर तसेच बोईसर औद्योगिक वसाहतीत कामाला जाण्यासाठी दांडाखाडी पुलामार्गे हाच रस्ता सोईस्कर बनतो. त्यामुळे दैनंदिन वाहनचालक व पर्यटक यांची मोठी रेलचेल असते. मात्र, शासकीय व लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे.