मुंबई | घाटकोपरमधील इमारत दुर्घटनेचे सीसीटीव्ही फुटेज काही वृत्तवाहिन्यांच्या हाती लागले आहे. या फूटेजमध्ये १७ जणांचा जीव घेणारा सुनील शितप अक्षरश: थोडक्यात बचावल्याचे दिसत आहे.
घाटकोपरच्या दामोदर पार्क इथली ३० वर्ष जुनी साईदर्शन इमारत २५ जुलै रोजी कोसळली. यात १७ जणांना जीव गमवावा लागला. मृतांमध्ये तीन महिन्यांच्या चिमुकलीचाही समावेश आहे. इमारत कोसळण्याच्या काही क्षणांपूर्वीच सुनील शितप इमारतीच्या बाहेर पडला होता. शितप गाडीत बसून निघाला आणि पुढील काही क्षणांत संपूर्ण साईदर्शन इमारत कोसळली. सीसीटीव्ही फुटेजनुसार १० वाजून १९ मिनिटांनी शितप आपल्या गाडीत बसून निघाला आणि १० वाजून २४ मिनिटांनी इमारत कोसळली.
या इमारतीच्या तळमजल्यावर सुनील शितपचे नर्सिंग होम होते. तिथे नुतनीकरणाचे काम सुरु होते. परंतु रुग्णालयाचे नुतीनकरण करताना इमारतीच्या मूळ रचनेलाच धक्का लावण्यात आला होता. यावेळी पिलर तोडून लोखंडी रॉडने आधार दिला होता. तसंच इमारतीच्या कॉलमलाही धक्का लावल्याने इमारत कोसळल्याचा आरोप रहिवाशांचा आहे.
पोलिसांनी याप्रकरणी आरोपी सुनील शितपला अटक केली आहे. आरोपी सुनील शितपने इमारतीचे पिलर हटवल्यामुळे १७ जणांचे जीव गेले. त्यामुळे सुनील शितपविरोधात भारतीय दंडविधान कलम 304 (2) (सदोष मनुष्यवधाचा गुन्हा), 336, 338, 283/17 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे