मुंबई (सीमा महांगडे -राणे) : येत्या 17 जुलै रोजी होणार्या राष्ट्रपती निवडणुकीच्या महाराष्ट्रातील तयारीचा आढावा सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी विधीमंडळाचे प्रधान सचीव अनंत कळसे यांनी सोमवारी विधीमंडळात घेतला. लोकसभेचे महासचीव डॉ अनूप मिश्रा हे यासाठी निवडणुक निर्णय अधिकारी असून प्रत्येक राज्यांच्या विधीमंडळाचे प्रधान सचीव हे त्यांचे सहाय्यक निर्वाचन अधिकारी आहेत. श्री कळसे यांनी या संदर्भात बोलताना सांगितले की राष्ट्रपती व उपराष्ट्रपती निवडणूक कायदा 1952 नुसार तसेच या कायद्याचे 1974 मध्ये जारी करण्यात आलेल्या नियमांनुसार ही निवडणूक प्रक्रिया होत असून अर्ज मागे घेण्याची मुदत 1 जुलैला समाप्त झाल्या नंतर आता दोन उमेदवार रिंगणात राहिले आहेत. रामनाथ कोविंद व मीराकुमार यांच्यात होणार्या या निवणडणुकीत महाराष्ट्र विधानसभेचे राज्यात 288 सदस्य मतदार महाराष्ट्र विधानसभेचे दोन सदस्य सध्या तुरुंगात आहेत. या पैकी छगन भुजबळ यांना उच्च न्यायलायाने राष्ट्रपती निवडणुकीत भाग घेण्यासाठी मतदानास येण्याची परवानगी दिली असून दुसरे राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांनाही अशीच परवानगी दिली जाईल अशी अपेक्षा आहे. श्री कळसे यांनी या संदर्भात स्पष्ट केले की या पूर्वी पप्पु कलानी व हितेंद्र ठाकूर हे तुरुंगामधून मतदानासाठी विधीमंडळात आले होते.
भुजबळांना परवानगी
महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात असलेले माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत मतदान करता येणार आहे. विशेष न्यायालयाने भुजबळ यांना मतदानाची परवानगी दिली. 17 जुलैरोजी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. गेल्या आठवड्यात भुजबळ यांनी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. आता भुजबळांना परवानगी मिळाल्यामुळे आण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या रमेश कदम यांनादेखील परवानगी मिळण्याची शक्यता आहे.
पसंतीक्रमाची सुविधा
त्यामुळे प्रत्येक मतदाराने मत पत्रिकवेर पसंतीच्या उमेदवाराच्या नावापुढे पसंतीचा क्रमांक एक वा दोन द्यायचा आहे. हे मतदान गुप्त पद्धतीचे असून निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार पुढील काळात मतदानाची व्यवस्था करण्यात येणार आहे. हे मतदान मुंबईत विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात 17 जुलै रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत पार पडेल. त्याच दिवशी सायंकाळी बंदोबस्तात मतपेट्या दिल्लीला पाठवल्या जातील आणि 20 जुलै रोजी संसदेत मतमोजणी पार पडेल असेही कळसेंनी स्पष्ट केले.