१९ आमदारांचे आज निलंबन मागे घेणार

0

मुंबई: अर्थसंकल्प सादर करत असताना विधानसभेत गोंधळ घालणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या 19 आमदारांचं निलंबन मागे घेण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याचे सुतोवाच संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी दिली होती. सलग तीन दिवसाच्या सुट्टीनंतर बुधवारी विधीमंडळाचे अधिवेशन होत आहे त्यामुळे सरकारच्या वतीने आमदारांचे निलंबन मागे घेण्यासाठी प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात १२ आमदारांचे व दुस-या टप्प्यात ७ आमदारांचे निलंबन रद्द करण्यात येणार असल्याचे समजते. त्यामुळे सरकार किती आमदारांचे निलंबन मागे घेते याकडे विरोधी पक्षांचेही लक्ष वेधले आहे.

शेतक-यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे या मागणीसाठी विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाल्यापासून विरोधक आक्रमक आहेत. अर्थसंकल्प सादर होत असताना विरोधकांनी घोषणाबाजी केली होती. सभागृहात गोंधळ घालणे, बॅनर फडकावणे, घोषणाबाजी करणे, अवमान करणे, अर्थसंकल्पाच्या प्रती जाळणे, सभागृहाची प्रतिमा मलिन करणे, सभागृहाचे अवमान करणे असे आरोप ठेवून काँग्रेस- राष्ट्रवादीच्या १९ आमदारांना निलंबित करण्यात आले आहे. सरकारच्या या मुजोरीविरोधात विरोधी पक्षांनी कणखर भूमिका घेत विधानसभेच्या कामकाजात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता. विधान परिषदेतही विरोधी पक्षांचे आमदार आक्रमक झाले होते. तेथील कामकाज सलग १३ दिवस ठप्प आहे. विरोधकांच्या अनुपस्थितीत सरकारने विधानसभेत लेखानुदान आणि विनियोजन विधेयक मंजूर करून घेतले आहे. परंतु विधान परिषदेत विरोधी पक्षांच्या सदस्यांची संख्या जास्त असल्याने तेथे जर हे विधेयक अडवले तर सरकारची अडचण झाली असती. त्यामुळे सरकारने नमती भूमिका घेत विरोधकांबरोबर चर्चा केली होती. लेखानुदान आणि विनियोजन विधेयक मंजूर करण्यास विरोधकांनी सहकार्य करण्याच्या मुद्दय़ावर अखेर समेट झाला हेाता. त्यानंतर विधान परिषदेत लेखानुदान मंजूर झाले. त्यानंतर संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी निलंबन मागे घेण्यास सकारात्मक असल्याची भूमिका मांडली हेाती.

या आमदारांचे निलंबन 

काँग्रेसचे निलंबित आमदार –

अमर काळे – काँग्रेस, आर्वी मतदारसंघ, वर्धा
विजय वडेट्टीवार- काँग्रेस, ब्रह्मपुरी, चंद्रपूर
हर्षवर्धन सकपाळ – काँग्रेस, बुलडाणा
अब्दुल सत्तार – काँग्रेस, सिल्लोड, औरंगाबाद
डी.पी. सावंत – काँग्रेस, नांदेड उत्तर
संग्राम थोपटे – काँग्रेस, भोर, पुणे
अमित झनक – काँग्रेस, रिसोड, वाशिम
कुणाल पाटील – काँग्रेस, धुळे ग्रामीण
जयकुमार गोरे – काँग्रेस, माण – सातारा

राष्ट्रवादी काँग्रेसचे निलंबित आमदार –

भास्कर जाधव – राष्ट्रवादी- गुहागर मतदारसंघ, रत्नागिरी
जितेंद्र आव्हाड – राष्ट्रवादी, कळवा, ठाणे
मधुसूदन केंद्रे – राष्ट्रवादी काँग्रेस, गंगाखेड, परभणी
संग्राम जगताप – राष्ट्रवादी, अहमदनगर
अवधूत तटकरे – राष्ट्रवादी, श्रीवर्धन, रायगड
दीपक चव्हाण – राष्ट्रवादी, फलटण – सातारा
नरहरी जिरवाळ – राष्ट्रवादी काँग्रेस दिंडोरी, नाशिक
वैभव पिचड- राष्ट्रवादी, अकोले – अहमदनगर
राहुल जगताप – राष्ट्रवादी काँग्रेस, श्रीगोंदा अहमदनगर
दत्तात्रय भरणे – राष्ट्रवादी काँग्रेस, इंदापूर, पुणे