मुंबई : इंग्लंडच्या १९ वर्षांखालील संघाने एकदिवसीय सामन्यात यजमान भारताच्या १९ वर्षांखालील संघाचा २३ धावांनी पराभव केला. यासह पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत इंग्लंडने १-० अशी आघाडी घेतली आहे. डेलरे रॉलिन्स आणि मॅथ्यू फिशर यांच्या शानदार अष्टपैलू खेळाच्या जोरावर हा विजय प्राप्त केला. सलामीवीर हिमांशू राणाने एकाकी झुंज देताना शतक झळकावून भारताच्या आशा कायम ठेवल्या होत्या.
७ बाद २५६ अशी मजल
वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजीस निमंत्रित केले. आघाडीची फळी कोसळल्यानंतर रॉलिन्सने कर्णधार फिशरसह सातव्या विकेटसाठी ११६ धावांची निर्णयाक भागीदारी करून इंग्लंडला ५० षटकांत ७ बाद २५६ अशी मजल मारू दिली. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात निराशाजनक झाली. भारतीय युवांना ४२.५ षटकांत सर्वबाद २३३ धावांचीच मजल मारता आली.
सलामीवीर राणाची एकाकी झुंज
सलामीवीर राणाने एकाकी झुंज देताना ८७ चेंडूत १२ चौकार व एका षटकारासह १०१ धावांची खेळी केली. मात्र, ३६व्या षटकात तो सातव्या फलंदाजाच्या रूपाने बाद झाल्यानंतर भारताचा पराभव निश्चित झाला. कमलेश नागरकोटीने ५१ चेंडंूत ३ चौकारांसह ३७ धावा काढून राणाला चांगली साथ दिली.दुसरीकडे, पृथ्वी शॉ (९), शुभम गिल (२९), कर्णधार अभिषेक शर्मा (४), सलमान खान (८), मयांक रावत (०) आणि हेत पटेल (२०) हे सर्व प्रमुख फलंदाज अपयशी ठरल्याने भारताला पराभवाला सामोरे जावे लागले.
भारताच्या फलंदाजीला खिंडार
इंग्लंडचा कर्णधार फिशरने ४१ धावांत ४ बळी घेत भारताच्या फलंदाजीला खिंडार पाडले, तर, हेन्री ब्रूक्स (२/२९), रॉलिन्स (२/४६) आणि मॅक्स होल्डन (२/४२) यांनी अचूक मारा करून यजमानांना जखडवून ठेवले. तत्पूर्वी, आघाडीची फळी कोलमडल्यानंतर रॉलिन्सने नाबाद शतक झळकावत सामन्यात निर्णायक भूमिका बजावली. त्याने ८८ चेंडूत ८ चौकार व ५ षटकारांची आतषबाजी मारताना नाबाद १०७ धावांचा तडाखा दिला. सलामीवीर हॅरी ब्रूकनेही ७५ चेंडूत ६ चौकारांसह ५१ धावांची खेळी केली. नागरकोटी (२/३६) आणि कर्णधार अभिषेक शर्मा (२/५२) यांनी इंग्लंडला रोखण्याचा चांगला प्रयत्न केला.