१ एप्रिलपासून बँकांचे एकत्रीकरण होणारच

0

मुंबई : भारतात कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढत असल्याने केंद्र सरकारने २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. याकाळातही देशातील १० सरकारी बँकांचे एकत्रीकरण करून चार मोठ्या बँकांची निर्मिती करण्यावर सरकार ठाम आहे. यामुळे येत्या १ एप्रिलपासून अनेक ग्राहकांच्या बँकांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.
रिझर्व्ह बँकेने शनिवारी या विषयी सूतोवाच केले. चालू महिन्याच्या सुरुवातीला या संदर्भातील एक अधिसूचना जारी करण्यात आली होती. ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडियाच्या शाखा पंजाब नॅशनल बँकेच्या शाखा म्हणून कार्यरत राहणार आहेत. त्याचवेळी सिंडिकेट बँकेचे कॅनरा बँकेमध्ये विलीनीकरण होणार आहे. आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँकेच्या शाखा युनियन बँक ऑफ इंडियामध्ये विलीन होणार आहेत. अलाहाबाद बँकेच्या शाखा इंडियन बँकेच्या शाखा म्हणून ओळखल्या जाणार आहेत.

रिझर्व्ह बँकेचे महाप्रबंधक योगेश दयाल यांनी जारी केलेल्या जाहिरातीनुसार, अलाहाबाद बँकेच्या सर्व शाखा १ एप्रिल २०२० पासून इंडियन बँकेमध्ये विलीन करण्यात येणार आहेत. याशिवाय आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँकेच्या सर्व शाखा १ एप्रिल २०२०पासून युनियन बँक ऑफ इंडियाच्या शाखा म्हणून कार्यरत राहणार आहेत.