जळगाव –
कोव्हिडमुळे येत्या वर्षीही शिक्षण ऑनलाईन राहील असं दिसत असताना, जळगाव जिल्हा प्रशासन आणि ‘वोपा’ सामाजिक संस्थेकडून महाराष्ट्रभरातील विद्यार्थ्यांसाठी मोफत शैक्षणिक अभ्यासक्रम देणाऱ्या ‘व्ही स्कूल’ या प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले. ऑनलाईन पार पडलेल्या या कार्यक्रमात जळगावचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन पाटील, प्रसिद्ध सिनेअभिनेते ललित प्रभाकर, सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका दीपा देशमुख, अभिनेते पुष्कराज चिरपुटकर, नाशिक शिक्षण विभाग उपसंचालक उपासनी उपस्थित होते.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण मिळवण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. इंटरनेटपासून ते अगदी अभ्यासासाठी वेळेत फोन मिळेपर्यंत अनेक गोष्टी यामध्ये असतात. या साऱ्याचा विचार करून ‘वोपा’ने ‘व्ही – स्कूल’ या ॲपची निर्मिती केली आहे. यामध्ये मल्टीमिडीया पद्धतीने अभ्यासक्रम उपलब्ध केला गेला असून अभ्यासाचे ऑफलाईन डाऊनलोडिंग शक्य आहे. तसेच, यात एकाच फोनवरून अनेक विद्यार्थी अभ्यास करू शकतील. यासाठी शैक्षणिक साहित्य निर्मितीसाठी जळगाव जिल्ह्यातील शिक्षक आणि प्रशासन सहकार्य करणार आहेत.
जिल्हाधिकारी अभिजित राऊत आणि जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी जळगाव जिल्हा या शैक्षणिक ॲपमध्ये संपूर्ण सहकार्य करणार असल्याची ग्वाही दिली. यानिमित्ताने उर्दू भाषेतील शैक्षणिक साहित्य ऑनलाईन माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्यात येईल, असेही राऊत यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले.
शैक्षणिक क्षेत्रातल्या अडचणींवर आजचे तरूण अगदी ‘साने गुरुजींची धडपडणारी’ मुलं असल्याप्रमाणे मात करत आहेत, असं प्रसिध्द लेखिका दीपा देशमुख यांनी आपल्या मनोगतात मांडले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या ॲपची खूप मदत होणार असल्याचे सांगून ॲपच्या विविध बाबींविषयी सविस्तर माहितीही त्यांनी आपल्या भाषणातून दिली.
गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे, यासाठी शिक्षकांनी किमान दिवसातला १ तास काढा आणि ‘व्ही – स्कूल’ ॲपसाठी अभ्यासक्रम तयार करा, जास्तीत जास्त शिक्षकांना यासाठी जोडून घ्या, थोडी का होईना मदत करा. असे आवाहन अभिनेता ललित प्रभाकर यांनी महाराष्ट्रभरातल्या शिक्षकांना केले. ज्यांना शिक्षणाची गरज आहे, पण त्यांच्यापर्यंत, तंत्रज्ञान किंवा पैशाच्या अभावाने शिक्षण पोहचू शकत नाही अशांपर्यंत या ॲपची माहिती पोहचवा, असेही त्यांनी सांगितले.
अभिनेते पुष्कराज चिरपुटकर यांनीही या प्रकल्पाला अधिकाधिक मदत करणार असल्याचे यावेळी सांगितले. ‘वोपा’चे संचालक प्रफुल्ल शशिकांत यांनी ॲपची आवश्यकता आणि वैशिष्ट्ये सांगितली. अजहर नदाफ यांनी शिक्षणविषयक गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात केली, तर ओंकार तोटे या विद्यार्थ्याने ऑनलाईन शिक्षणात या ॲपमुळे खूप मदत होईल असे सांगितले. ‘वोपा’च्या संचालिका ऋतुजा जेवे यांनी सूत्रसंचालन केले. ‘वोपा’ने गेल्या शैक्षणिक वर्षात वेबसाईटच्या माध्यमातून लाखो विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले असून, गेल्या वर्षभरात सव्वा कोटी पेज व्ह्यूजसह ही वेबसाईट महाराष्ट्रभरातील विद्यार्थ्यांनी वापरली आहे आणि आता मोफत ॲपच्या माध्यमातून ‘वोपा’ व जळगाव जिल्हा परिषद तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहचवत आहेत.