पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत शहराच्या विविध भागातील १० ठिकाणी ९ हजार ४५८ सदनिका बांधण्याचे नियोजन केले आहे. बो-हाडेवाडीत १ हजार २८८ सदनिका बांधण्यासाठी १२३ कोटी ७८ लाखांचा खर्च येणार आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीची मंजुरी घेतली जाणार आहे.
महापालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेसाठी नागरिकांकडून अर्ज मागविले आहेत. शहराच्या विविध भागात १० ठिकाणी ९ हजार ४५८ सदनिका बांधण्याचे नियोजन आहे. त्यानुसार च-होली येथे १४४२ , रावेतमध्ये 934, डुडुळगावमध्ये 896, दिघीत 840, मोशी-बो-हाडेवाडीमध्ये 1288, वडमुखवाडीत 1400, चिखलीमध्ये 1400, पिंपरीत 300, पिंपरीतच आणखी 200 आणि आकुर्डीमध्ये 500 सदनिका उभारण्याचे प्रस्तावित आहे.
महापालिकेने या योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करून आधी राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला. राज्य सरकारच्या तांत्रिक समितीने नोव्हेंबर 2017 मध्ये महापालिकेच्या प्रकल्प अहवालांना मंजुरी देऊन ते केंद्र सरकारकडे अंतिम मान्यतेसाठी पाठविले होते. केंद्रानेही महापालिकेच्या प्रकल्प अहवालांना मंजुरी दिली आहे.
या योजनेअंतर्गत बो-हाडेवाडी येथे बांधण्यात येणा-या 1288 सदनिकांसाठी पालिकेने निविदा मागविल्या होत्या. या कामासाठी तीन ठेकेदारांनी निविदा सादर केल्या. त्यामध्ये एस. जे. कॉन्ट्रॅक्टस प्रा. लि. या ठेकेदाराने 134 कोटी 36 लाख 72 हजार 330 रुपये, करण बिल्डर्स या ठेकेदाराने 139 कोटी 87 लाख 40 हजार 868 रुपये आणि बेंचमार्क रिअॅलिटी एलएलपी या ठेकेदाराने 143 कोटी 17 लाख 81 हजार 991 रुपये दर सादर केले आहेत. त्यातील एस. जे. कॉन्ट्रॅक्टस या ठेकेदाराची इतर दोन ठेकेदारापेक्षा कमी दराची, परंतु, पालिकेच्या निविदा दरापेक्षा 24 कोटी 23 लाख 1 हजार 568 रुपये जादा दराची निविदा प्राप्त झाली आहे. हा दर कमी करुन देण्यासाठी पालिकेने या ठेकेदाराला चार वेळा पत्र पाठविले होते. चौथ्या वेळेस या ठेकेदाराने 123 कोटी 78 लाख 37 हजार 894 रुपयांत हे काम करण्याची अंतिम तयारी दर्शविली आहे.
राज्य सरकारच्या दरसूचीनुसार आणि जीएसटी, टेस्टिंग चार्जेस, आरसीसी डिझाईन, सिमेंट व स्टीलच्या दरातील फरक आणि रॉयल्टी शुल्कासह या कामाची किंमत 121 कोटी 19 लाख 3 हजार 165 रुपये होत आहे. ठेकेदाराने 123 कोटी 78 लाख 37 हजार 894 रुपये दर सादर केले आहेत. त्यामुळे या कामासाठी 2 कोटी 59 लाख 34 हजार 728 रुपये म्हणजे 2.14 टक्के जादा खर्च येणार आहे. त्यानुसार एस. जे. कॉन्ट्रॅक्टस या ठेकेदाराची 123 कोटी 78 लाख 37 हजार 894 रुपयांची निविदा 22 जून 2018 रोजी स्वीकारण्यात आली आहे. आता या खर्चाला स्थायी समितीची मंजुरी घेण्यात येणार आहे.