१.८८ लाख बालकांना डोस

0

धुळे : राष्ट्रीय पोलिओ निर्मूलन कार्यक्रमांतर्गत रविवार 29 जानेवारी 2017 रोजी धुळे जिल्ह्यात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेची तयारी जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 1,88,745 बालकांना पोलिओचा डोस देण्यात येणार आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अरविंद मोरे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मोरे यांनी म्हटले आहे, पोलिओ लसीकरण मोहिमेचे जिल्हा व तालुकास्तरावर नियोजन झाले आहे. या कामासाठी विविध शासकीय विभाग व स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जाणार आहे. पोलिओचे डोस देण्यासाठी लागणारी पोलिओ लस 3 लाख 22 हजार एवढी प्राप्त झाली आहे. तिचे वाटप करण्यात आले आहे. शीतसाखळी अबाधित ठेवण्यासाठी आइस पॅक तयार करण्यात आले आहेत.

कामगारांच्या मुलांसाठी मोबाईल टीम
बसस्थानक, रेल्वेस्थानक, ऊस तोड कामगार, वीटभट्टी कामगार, रोड कामगार, बाजार, यात्रा या ठिकाणी बालकांना पोलिओ डोस देण्यासाठी ट्रान्झिट टीम, मोबाईल टीम यांची व्यवस्था करण्यात आली आहे. पाच वर्षाच्या आतील एकही बालक पेालिओ डोस घेण्यापासून वंचीत राहणर नाही याची काळजी घेण्यात येणार आहे. जिल्ह्यात 188745 बालकांना पोलिओ डोस देण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी 1226 लसीकरण केंद्रांचे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्यक्ष बूथवर डोस देणे, बालकांना बोलावून आणणे यासाठी 3343 कर्मचारी असणार आहेत. 245 अधिकारी, कर्मचारी यांच्यामार्फत पर्यवेक्षण केले जाणार आहे.

44 ट्रान्झिट पथके तैनात
जिल्हास्तरावरील 4 तालुक्यांचे पर्यवेक्षणासाठी स्वतंत्र 10 अधिकारी व 30 जिल्हास्तरीय पर्यवेक्षक यांची नेमणूक करुन त्यांच्यामार्फत पर्यवेक्षण केले जाणार आहे. बसस्थानक, रेल्वेस्थानक, तपासणी नाके या ठिकाणी 44 ट्रान्झिट पथके तैनात असतील. भटके कामगार, वीटभट्टी, ऊसतोड कामगार, रोड कामगार यांच्या बालकांना पोलिओ डोस देण्यासाठी 80 फिरते पथके असतील. जिल्ह्यातील 41 प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी 41 4 तालुका अधिकारी व 82 वैद्यकीय अधिकार या मोहिमेचे नियोजन करीत आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांना प्रार्थनेच्या वेळी पल्स पोलिओ लसीकरणाची माहिती देण्यात येत आहे. तसेच महिला मंडळ, गटचर्चेच्या माध्यमातून या मोहिमेविषयी जनजागृती करण्यात येत आहे.

लसीकरण स्लीप वाटप
बसस्थानक, रेल्वेस्थानकावरील उदघोषणा केंद्रावरुन बालकांना पोलिओ डोस देण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. पाच वर्षाच्या आतील सर्व बालकांना पोलिओ डोस घेण्यासाठी लाभार्थी लसीकरण स्लीप वाटप करण्यात येत आहे. या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून पाच वर्षाच्या आतील बालकांस पोलिओ डोस पाजून घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा पल्स पोलिओ लसीकरण समन्वय समितीचे अध्यक्ष दिलीप पांढरपट्टे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा या समितीचे सहअध्यक्ष ओमप्रकाश देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी तथा या समितीचे सदस्य सचिव डॉ. मोरे यांनी केले आहे.