मुंबई: कॉंग्रेसचे राज्यातील नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी महाविकास आघाडीविषयी केलेल्या एका वक्तव्यावरून शिवसेनेला घेरणाऱ्या भाजपवर शिवसेनेने पलटवार केला आहे. २०१४ साली हिंदुत्व, हिंदू मतांचे विभाजन आणि २५ वर्षांच्या नात्याचा विचार न करता भाजपाने निर्घृण पद्धतीने शिवसेनेशी असलेली युती तोडली. त्यातून भाजपचा पहिला मुखवटा उतरला, पण त्यानंतरही खरा चेहरा बाहेर आला नाही. कारण त्यांचं एका मुखवट्यावर भागत नसल्याचे शिवसनेने म्हटले आहे.
२०१४ साली भाजप-शिवसेना वेगळे लढले तसे काँग्रेस-राष्ट्रवादी वेगळे लढले. चौरंगी लढतीत भाजप १२२जागा जिंकून मोठा पक्ष ठरला. शिवसेनेने स्वबळावर ६३ जागा घेतल्या. काँग्रेस ४२ तर राष्ट्रवादी ४१ जागांवर थांबले. म्हणजे विधानसभा त्रिशंकूच ठरली असं स्पष्टीकरण शिवसेनेने दिलं आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा दारुण पराभव झाला व सत्ताधारी काँग्रेस थेट तिसऱ्या स्थानावर फेकली गेली. त्यामुळे काँग्रेसला त्यावेळी आवाज नव्हता. चव्हाण यांच्याकडे सरकार स्थापनेचा प्रस्ताव घेऊन जाण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता असं सांगत शिवसेनेने पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा फेटाळून लावला आहे.
त्याचसोबत पृथ्वीराज चव्हाण काय बोलले त्यात आम्हाला पडायचे नाही; पण यानिमित्ताने भाजप आपला चेहरा स्वतःच ओरबाडीत आहे. २०१४ साली भाजपचाच खरा चेहरा उघड झाला व तो संपूर्ण देशाने पाहिला. पृथ्वीराज चव्हाण जे सांगतात त्यात लॉजिक नावाचा प्रकार अजिबात नाही हे आधी मान्य केले पाहिजे. तसेच पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्याने फारशी खळखळ किंवा खळबळ होण्याचे कारण नव्हते असं शिवसेनेनं सांगितलं आहे.