दिल्ली : इंग्लंडविरुद्ध पार पडलेल्या कसोटी मालिकेत नवोदित यष्टीरक्षक ऋषभ पंतने आपल्या कामगिरीची दखल सर्वांना घ्यायला लावली. अखेरच्या कसोटी सामन्यात लोकेश राहुलसोबत शतकी भागीदारी करत कसोटी क्रिकेटमधलं आपलं पहिलं शतक झळकावलं. मात्र २०१९ विश्वचषकाचा विचार करत असता वन-डे संघात धोनीचं संघात यष्टीरक्षक म्हणून असणं गरजेचं असल्याचं मत माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने व्यक्त केलं आहे. तो खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.
“जरीही ऋषभ पंतची वन-डे संघात निवड झाली, तरीही तो १५-१६ सामन्यांपेक्षा जास्त सामने खेळू शकणार नाही. ऋषभ पंत आक्रमक फलंदाज आहे. तो मैदानात चांगले षटकार खेचू शकतो, मात्र धोनीने आतापर्यंत एकट्याच्या जीवावर भारताला सामने जिंकून दिले आहेत. त्यामुळे २०१९ पर्यंत धोनी संघात असणं गरजेचं आहे.” सेहवागने आपलं मत मांडलं.