२०२१ पूर्वी मेट्रो प्रकल्प पूर्ण होईल

0
महामेट्रोच्या अधिकाऱ्यांना विश्वास
पुणे : नियोजित आराखड्याप्रमाणे २०२१ पूर्वी पुणे मेट्रो प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण होईल असा विश्वास पुणे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
पुणे मेट्रो रेल प्रकल्पाचे भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दोन वर्षांपूर्वी दिनांक २४ डिसेंबर रोजी झाले होते. पुणे मेट्रोच्या वाटचालीत तो ऐतिहासिक दिवस होता असे पुणे मेट्रोच्या वतीने अधिकाऱ्यांनी ट्विटरवर म्हटले असून २०२१ पर्यंत काम पूर्ण झाले असेल अशी ग्वाही दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवाजीनगर – हिंजवडी मेट्रो मार्गाच्या भूमीपूजनानिमित्त नुकतीच पुण्याला भेट दिली. त्यावेळी पंतप्रधानांनी पुणे मेट्रोच्या प्रगतीबद्दल प्रशंसा केली आणि २०१९ मध्ये १२ किलोमीटरपर्यंत मेट्रो धावू लागेल असा विश्वास दिला. त्यानंतर कामाला अधिक गती मिळाली आहे.
पुणे मेट्रो रेल प्रकल्पात पिंपरी ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी अशा ३१ किलोमीटरच्या दोन मेट्रो मार्गांचे काम चालू आहे. टनेल बोअर मशिनच्या सहाय्याने लवकरच शिवाजीनगर ते स्वारगेट अशा भुयारी मार्गाचे काम सुरु होईल आणि मेट्रोच्या कामाची व्याप्ती वाढलेली दिसेल.