शिफारशी व दुरुस्तीसह जनरल सभेच्या मंजुरीसाठी बजेट सादर
चाळीसगाव – नगरपरिषदेची येत्या २०१८-१९ च्या सुधारित तसेच २०१९-२० च्या अंदाजीत अंदाजपत्रकासाठी सोमवारी स्थायी समितीची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला नगराध्यक्ष आशालता विश्वासराव चव्हाण, पालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, यांच्यासह सत्ताधारी पक्षाचे गटनेते संजय पाटील, घृष्णेश्वर पाटील, चिराग शेख, अरुण अहिरे, विजया पवार, वैशाली राजपूत यांच्यासह पालिकेचे मुख्य अभियंता राजेंद्र पाटील, अभियंता विजय पाटील यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. यावेळी वार्षिक अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकावर नवनियुक्त सभापती यांनी चर्चा केली. यावेळी स्थायी समितीच्या सदस्यांनी अनेक शिफारशी व काही दुरुस्त्या सुचवल्या. या अंदाजपत्रकावर सखोल व अभ्यासपूर्ण चर्चा झाली. यंदा २१० कोटी रुपयांच्या या अंदाजपत्रकाला सर्वसाधारण सभेच्या मान्यतेसाठी सभेपुढे ठेवण्यात येईल. मगच त्याला अंतिम मंजुरी मिळते. शासकीय नियमानुसार ३१ जानेवारीपर्यंत स्थायी समितीची मंजुरी अंदाजपत्रकाला आवश्यक असते. या समितीच्या मंजुरीनंतर सर्वसाधारण सभेत ठेवण्यात येते व तिला २८ फेब्रुवारीपर्यंत सर्व साधारण सभेची अंतिम मंजुरीची आवश्यकता असते. अशी माहिती पालिकेच्या लेखा विभागाने सांगितले. याप्रसंगी पालिकेचे कृणाल कोष्टी, स्नेहल फडतरे, श्वेता शिंदे, राहुल साळुंके, अभियंता संजय अहिरे, दिनेश जाधव, लेखापाल माधव कुंटे, दीपक देशमुख, विजय खरात यांच्यासह पालिकेचे सर्व विभागाचे प्रमुख उपस्थित होते.
पहिल्यांदाच सभा शांततेत
पालिकेच्या गेल्या स्थायी समितीच्या पक्षीय बलाबल पाहता त्यात सत्ताधारी भाजपाला बहुमताची मोठी अडचण निर्माण झाली होती. त्यातच तेव्हाचे भाजपचे गटनेते राजू आण्णा चौधरी यांच्या ताठर भूमिकेमुळे गेल्या वर्षीच्या सर्वच सभा गाजल्या. मात्र पंधरा दिवसांपूर्वी सभापती निवडीत स्थायी समितीमध्ये भाजपने मुसंडी मारत बहुमत सिद्ध साध्य केले. त्यामुळे आजची सभा शांततेत पार पडली. अतिशय अभ्यासपूर्ण चर्चा होऊन सुमारे दोन तास चालली. आजच्या सभेला विरोधी गटाचे नेते राजीव देशमुख, उपगटनेते सुरेश स्वार हे अनुपस्थित होते.