२१ ऑगस्टचे सूर्यग्रहण नासा पहाणार ५० हजार फुट उंचीवरून

0

नवी दिल्ली : शास्त्रज्ञांच्या एका गटाने दोन पुनर्संयोजित डब्लूबी-५७ एफ जेट विमानांमधून आकाशात उंचावरील बिंदूवरून २१ ऑगस्टच्या सूर्यग्रहणात दिसणारी सुर्याची बाह्यस्तरीय कडा, चंद्राची सावली, बुधग्रहाचा पृष्ठभाग, अभ्यासण्याचे ठरवले आहे.

कोलरेडोच्या साऊथवेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटमधील अमीर कास्पी आणि त्यांच्या चमुने विमानांच्या समोर सामर्थ्यशाली दुर्बिणी जोडल्या आहेत. ते पृथ्वीपासून ५० हजार फूट उंचीवर जाऊन सुर्याच्या बाह्यस्तराची प्रतिमा फोटो काढून मिळविणार आहेत. नेहमी सुर्यामुळे झाकोळून जाणाऱ्या बुधाचेही फोटो ते घेणार आहेत, असे नासाने सांगितले आहे. या उंचीवर आपण पहातो त्या पेक्षा आकाश ३० पट गडद असते. वातावरणाचा अडथळाही तेथे कमी असतो.

सुर्याचा सर्वात बाहेरचा स्तर त्याच्या केंद्रानजिकच्या भागापेक्षा शेकडो पट जास्त तापतो. छोटे स्फोट नॅनो फ्लेअर्स बाह्यस्तराकडे उष्णता उत्सर्जित करतात. या फ्लेअर्सना शोधणे कठिण असते. परंतु जेटवर लावलेल्या दुर्बिणी त्यांना शोधून प्रतिमा मिळविण्यात यशस्वी ठरतील. बुधाविषयी जास्त माहिती मिळविणे या निरीक्षण जेटमुळे शक्य होणार आहे. आयनांनी युक्त वायूमधील आल्फवेन वेव्हज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लहरी चुंबकीय क्षेत्रात कसे भौतिकशास्त्रीय वर्तन करतात हेही नासाच्या या मोहिमेतून कळणार आहे. सूर्य आणि बुध यांच्यामधील ग्रहिका (एस्टेरॉइड) यांची माहितीही मिळणार असल्याचे नासाने सांगितले आहे.