जळगाव: जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर संपूर्ण जिल्ह्याचे अध्यक्ष निवडीकडे लक्ष लागले होते. अध्यक्ष पद सर्वसाधारण महिला राखीव निघाले असल्याने सलग तिसऱ्यांदा जि.प.वर महिला राज येणार आहे. निवडणुकीच्या तारखांकडे लक्ष लागले होते. अखेर अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी तारीख जाहीर करण्यात आली आहे. २१ डिसेंबर रोजी अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड होणार आहे. मंगळवारी १० रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून याबाबतचे आदेश पारित करण्यात आले आहे. ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना पत्र पाठवून २० डिसेंबरपर्यंत अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम पार पडण्याचे आदेश दिले होते.
जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतींचा कार्यकाळ २१ जानेवारीला संपणार आहे. तत्पूर्वी ही निवडणूक होणार आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठीचे आदेश प्राप्त होताच जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने तयारी सुरु केली आहे. सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे यांनी तातडीने कर्मचाऱ्यांना बोलवून निवडणुकीची कल्पना दिली आणि अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीसाठी विशेष सभा बोलविण्याच्या नियोजनाच्या सूचना केल्या.
भाजपकडे बहुमत, मात्र…
पक्षीय बलाबल पाहता जिल्हा परिषदेत भाजपचे वर्चस्व आहे. मात्र २०१७ ला भाजपकडे बहुमतासाठी एका जागेची आवश्यकता असताना कॉंग्रेससोबत हातमिळवणी करून सत्ता मिळविली होती. यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दोन सदस्य अपात्र झाल्याने बहुमताचा आकडा ३४ वरून ३३ वर आले आहे. त्यामुळे भाजपकडे स्पष्ट एकहाती बहुमत आहे. मात्र तरीही पहिल्या टर्म प्रमाणे कॉंग्रेस भाजपसोबतच राहणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या पक्षांतराची चर्चा सुरु आहे, त्यातच जर खडसे यांनी वेगळी भूमिका घेतली तर खडसे यांचा गट फुटून महाविकास आघाडीसोबत जाऊन सत्तांतर होईल असे तर्क लावले जात आहे. मात्र खडसेंनी वेगळी भूमिका घेतली तरच हे शक्य आहे. परंतु आकडेवारी पाहता भाजपला सत्तेपासून रोखता येणे अवघड आहे.