२१ तासानंतर ‘लालबागच्या राजा’चे विसर्जन !

0

मुंबई: कालपासून श्रीगणरायाला निरोप देण्यात येत आहे. राज्यातील मोठ्या शहरात दुसऱ्या दिवशीही विसर्जन मिरवणूक सुरु आहे. तब्बल २१ तासांनंतर ‘लालबागच्या राजा’चे गिरगावच्या समुद्रात शाही विसर्जन करण्यात आले. दहा दिवस बाप्पाची मनोभावे पूजा केल्यानंतर अखेरची आरती घेऊन बाप्पाला अलोट गर्दीच्या साक्षीने गिरगाव चौपाटीच्या समुद्रात बाप्पाला निरोप देण्यात आला.

मुंबईतील लालबागमध्ये गुरुवारी सकाळी ११ च्या सुमारास लालबागच्या राजाची आरती घेऊन मिरवणुकीला सुरुवात झाली. पारंपारिक वेषातच भाविकांनी या मिरवणुकीत भाग घेतला. कुठे ढोलताशांचा दणदणाट… कुठे फटाक्यांची आतषबाजी… तर कुठे गुलालाची उधळण… आणि ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’चा जयघोष… अशा भारावलेल्या वातावरणात बाप्पाची मिरवणूक सुरू होती. दरवर्षी प्रमाणे अत्यंत शिस्तबद्धपणे निघालेल्या या मिरवणुकीचे फुले वाहून ठिकठिकाणी स्वागत आणि पूजा करण्यात आली. लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी मिरवणूक मार्गावर मुंबईकरांनी अलोट गर्दी केली होती. ज्या ज्या मार्गावरून लालबागच्या राजाची मिरवणूक निघाली तो रस्ता गुलालाने न्हाऊन निघाला होता. अनेकजण या नयनरम्य मिरवणुकीचे चित्रीकरण करण्यात मग्न झाले होते, तर काहीजण मिरवणुकीसोबत सेल्फी काढण्यात गुंग झाले होते.