नवी दिल्ली: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच असल्याने संपूर्ण जगासमोर संकट उभे आहे. भारतातील कोरोना ग्रस्तांच्या संख्येत दररोज हजारोंच्या संख्येत वाढ होत असल्याने चिंता वाढली आहे. मागील चोवीस तासांत देशभरात प्रथमच २४ हजार ८५० नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर, ६१३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. करोना रुग्ण संख्या वाढीचा हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. यामुळे देशभरातील करोनाबाधितांची एकूण संख्या ६ लाख ७३ हजार १६५ वर पोहचली आहे.
देशभरातील तब्बल ६ लाख ७३ हजार १६५ कोरोना बधीतांमध्ये २ लाख ४४ हजार ८१४ जणांवर उपचार सुरु आहे. उपचार घेऊन ४ लाख ९ हजार ८३ जण बरे झाले आहे. आतापर्यंत करोनामुळे १९ हजार २६८ जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात कोरोनाची लस तयार करण्यात आल्याचा दावा केला जात असून त्याचा वापर १५ ऑगस्टपासून करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर लस जारी करण्याच्या सरकारच्या प्रयत्नावर वैज्ञानिकांनी धोक्याचा इशारा दिला आहे. आयसीएमआरने पुढील महिन्यात करोनावरची स्वदेशी लस स्वातंत्र्य दिनापर्यंत तयार झालीच पाहिजे, असे फर्मान संबंधित औषध कंपन्या, रुग्णालये व वैज्ञानिक संस्था यांना सोडल्याने त्यावर टीका करण्यात आली आहे.