जळगाव- खान्देशी वाग्यांच्या भरीताला जगप्रसिध्द करण्याचा ध्यास आखला आहे. त्यामुळे येत्या २१ डिसेंबर रोजी सागर पार्क येथे १० बाय १० फुटाची व्यास असलेली स्टेनलेस स्टीलच्या कढईत २५०० किलो भरीत बनविण्याचा विश्वविक्रम करणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे सुप्रसिध्द शेफ विष्णू मनोहर यांनी पत्रकार परिषदेत सांगितली़ मराठी प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने हा विक्रम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले़
२५०० किलो भरीत बनविण्याच्या विश्वविक्रमा संदर्भात माहिती देण्यासाठी आर्किटेक शिरीष बर्वे यांच्या कार्यालयात सोमवारी अडीच वाजता मराठी प्रतिष्ठानातर्फे पत्रकार परिषद धेण्यात आली़ यावेळी अध्यक्ष अॅड़ जमील देशपांडे, सचिव विजय वाणी, संचालक निलोफर देशपांडे, अनुराधा रावेरकर, संध्या वाणी आदी उपस्थित होते़ माहिती देतांना विष्णू मनोहर पूढे म्हणाले की, यावल तालुक्यातील बामणोद येथे वाग्यांची शेती पाहून गेल्या वर्षीपासून खान्देशी भरीताला जगप्रसिध्द करण्यासाठी तयारी सुरू केली होती. २५०० किलो भरीत बनविण्यासाठी सागर पार्क हे ठिकाण निश्चित झाले आहे़ एकाच वेळी पाच ते सहा हजार नागरिक हा विक्रम बघू शकरणार आहे.
कोल्हापूर येथून येणार कढई तब्बल २५०० किलो भरीत बनविण्यासाठी कोल्होपूर येथे कढई तयार केली जात आहे़ ती १० बाय १० फुटाची असणार असून तीन फुट खोल असेल़ ही कढई तब्बल ४५० किलो वजणाची असणार असून तीला चुलीवर ठेवण्यासाठी क्रेनची मदत घेणार असल्याची माहिती मनोहर यांनी दिली़ जगात कुठेही भरीताचा विक्रम झालेला नाही, हा पहिलाच असणार आहे़ पुण्याला कढईची डमी प्रॅक्टीस सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले़
११ फुट लांब असणार सराटा भरीत बनविण्यासाठी लागणारा सराटा ११ फुट लांब असणार आहे़ गीनीज बुक्स आॅफ वर्ल्ड रेकॉर्डनुसार भरीत बनवितांना कुठल्याही मशिनीचा वापर होणार नाही़ सोबतच ही प्रक्रिया करत असताना कढईजवळ स्वत: मी आणि देवराम भोळे व दत्तु चौधरी यांच्यापैकी एकसोबत असणार असल्याचे मनोहर यांनी सांगितले़ पहाटे ५ वाजेपासून भरीत भाजण्याला सुरूवात होईल़ पारंपारिक पध्दतीने ही संपूर्ण प्रक्रिया केली जाणार आहे़ २० डिसेंबर रोजीच बामणोद येथून वांगे आणली जाणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.