२५०० रुपयांची लाच स्वीकारली जि.प. कनिष्ठ सहायक जाळ्यात

 

जनशक्ती न्यूज | नंदुरबार |  जि.प. लघु सिंचन विभागामार्फत केलेल्या कामाची १० टक्के सुरक्षा अनामत रक्कम परत मिळवण्यासाठी २ हजार ५०० रुपयांची लाच स्विकारणाऱ्या जि.प.चे कनिष्ठ सहाय्यक गुप्तेश चंद्रकांत सुगंधी याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे.

यातील मुळ तक्रारदाराचा मोठा भाऊ विशाल यांना जिल्हा परीषदेच्या लघु सिचन विभागातून सन २०१८-१९ मध्ये जिल्ह्यात विविध ठिकाणी लघुबंधारे बांधकामाचे काम मिळालेले होते.

तक्रारदारांचा सिव्हील डिप्लोमा झालेला असल्याने भाऊ विशाल यास वरील कामकाजाकरीता शासकीय ठेक्याचे बांधकाम मिळाले. तक्रारदारांना मिळालेल्या कामापैकी पूर्ण झालेल्या कामाची बिले मिळाली होती. परंतु सदर कामाच्या बिलामधून १०टक्के कपात केलेली सुरक्षा अनामत रक्कम जिल्हा परीषद लघु सिंचन विभागामार्फत सदर फाईलचे कामकाज पूर्ण झाल्यावर धनादेश स्वरुपात मिळणार आहे. त्याकरीता तक्रारदार हे लघु सिंचन विभागात गेले. कनिष्ठ सहायक गुप्तेश चंद्रकात सुगंधी यांना भेटून लघु बंधारे बांधकाम पूर्ण केलेल्या कामांची १० टक्के सुरक्षा अनामत रक्कम धनादेश काढण्याबाबत विचारणा केली असता, बिलाचे फाईलचे काम करण्याच्य मोबदल्यात २ हजार ५०० रुपये लाचेची मागणी केली. सदर लाचेची रक्कम २३नोव्हेंबर २०२१ रोजी पंच व साक्षीदार यांच्या समक्ष जिल्हा परिषद येथील लघु सिंचन विभागातील कार्यालयात स्विकारली.
त्याला पंच, साक्षीदारांसमक्ष रंगेहाथ पकडण्यात आले आहे. ही कामगिरी पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलिस अधीक्षक सतीश भामरे, पोलिस उपअधीक्षक सुनील कुराडे, यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक समाधान वाघ, माधवी वाघ, पोहवा उत्तम महाजन, पोहवा संजय गुमाणे, पोहवा विजय ठाकरे, पोना मनोज अहिरे,पोना दिपक चित्ते, मपोना ज्योती पाटील,पोना नावाडेकर, चापोना महाले यांच्या पथकाने केली आहे.