मुंबई : राज्य सरकराने १५ नोव्हेंबरपर्यंत मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात मात्र या आश्वासनांची पूर्तता होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. या मागण्यांची पूर्तता न झाल्यास २५ नोव्हेंबरपासून सर्व आमदार आणि खासदारांच्या घरांसमोर राज्यव्यापी ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा ‘मराठा क्रांती ठोक मोर्चा’ने दिला आहे. शुक्रवारी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली.
‘भाजप सरकार आणि मुख्यमंत्री यांच्यावर आता मराठा समाजाचा विश्वास राहिलेला नाही. जी तोंडी व लेखी आश्वासने देण्यात आली होती, ती फसवी निघाली आहेत. त्यामुळे सर्व आमदार आणि खासदारांनी पक्षप्रमुखांशी बोलून व मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून विशेष अधिवेशन घेऊन मराठा आरक्षण जाहीर करावे, अन्यथा मराठा क्रांती ठोक मोर्चा शांतपणे ठिय्या आंदोलन करणार आहे,’ अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
या आंदोलकांना आचारसंहिता आखून देण्यात येणार आहे. राज्य सरकारशी अनेकवेळा यासंदर्भात चर्चा, बैठका झाल्या, मात्र अद्याप कोणताही यावर तोडगा निघालेला नाही. त्यामुळे सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय जाहीर केला नाही, तर तीव्र आंदोलनाला पुन्हा एकदा सामोरे जावे लागेल, असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाचे आबासाहेब पाटील आणि रमेश केरे पाटील यांनी यावेळी दिला. धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजानेही मराठा समाजाला पाठिंबा दिला आहे, त्यामुळे हे आंदोलन तीव्र असेल, अशी माहिती आबासाहेब पाटील यांनी दिली.