शिरपूर। लिफ्ट देण्याच्या बहाण्याने दोन जणांनी एका युवकाला दुचाकीवर बसवून निर्जनस्थळी नेत त्याच्याकडील मोबाईल व रोकड असा २५ हजार रूपयांचा ऐवज लुटल्याच्या गुन्ह्यात दोघांना शहर पोलिसांनी अटक केली असून दोन दिवस पोलीस कोठडी दिली आहे. हा तपास मोबाईलवरून लागला आहे. ही लुटीची घटना २३ फेब्रुवारी २०२० रोजी दुपारी शहरात घडली होती.
जितेंद्र गौतमचंद जैन (२८, रा.खापर ता.अक्कलकुवा जि.नंदुरबार) करवंद नाक्याकडून निमझरी नाक्याकडे जात असतांना दोन संशयितांनी त्याला लिफ्ट दिली. दुचाकी मांडळ रस्त्यालगतच्या निर्जनस्थळी नेत जितेंद्र जैनला दमदाटी करून पाच हजार रूपये किंमतीचा मोबाईल व २० हजार रूपये रोख असा ऐवज लुटला. त्याला तेथेच सोडून संशयित फरार झाले होते. जितेंद्र जैन याने दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांत दोन अनोळखी संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
चोरीस गेलेला मोबाईल शहरातील वाल्मिकनगर परिसरात एकाकडे असल्याचे निष्पन्न झाले. त्याला विचारणा केल्यावर मोबाईल अशोक राजेंद्र चौधरी (२२, रा.किस्मत नगर, शिरपूर) याच्याकडून घेतल्याची माहिती त्याने दिली. अशोक चौधरीला ताब्यात घेतल्यावर त्याने साथीदार राहुल मारूती बेलदार (२७, रा.किस्मतनगर) याच्या मदतीने एका युवकाकडून मोबाईल व रोकड लुटल्याची कबुली दिली.त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली.
या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.राजू भुजबळ, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने व शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक किरण बाऱ्हे तपास यांनी लावला.