२0१७ वर्ष दोंडाईचा पालिकेतर्फे स्वच्छता वर्ष जाहीर

0

दोंडाईचा : शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी २0१७ हे वर्ष स्वच्छता वर्ष म्हणून जाहीर केले आहे. यासाठी दि. १ जानेवारी पासून वर्षभर स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्षा नयनकुंवर रावल यांनी दिली. दोंडाईचा शहरात गेल्या अनेक वर्षांपासून मोठय़ा प्रमाणावर घाणीचे साम्राज्य निर्माण झालेले आहे. मागील काळात आरोग्यविषयक सुविधांची दैनावस्था झाल्याने अनेक साथीचे रोग तसेच धुळीचा शहरातील जनतेला मोठा त्रास सहन करावा लागत होता. यासाठी ही स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत सर्व समाजसेवी संस्था, शैक्षणिक संस्था व नागरिकांनी स्वच्छेने सहभागी व्हावे, असेही आवाहन नगराध्यक्षा नयनकुंवर रावल यांनी केले आहे.

रावल यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागाची बैठक झाली त्यात त्यांनी ही घोषणा केली. याबाबत माहिती देतांना रावल म्हणाल्या, स्वच्छता मोहिमेची सुरुवात दि.१ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता एकाच वेळी सर्व १२ प्रभागांमध्ये त्या-त्या प्रभागातील नगरसेवक, विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यात शहरातील विविध सेवाभावी संस्था, संघटना, मित्रमंडळ, धार्मिक संप्रदाय, राजकीय पक्ष तथा संघटना, शैक्षणिक संस्थांचा सहभाग राहणार आहे. यासाठी आरोग्य व स्वच्छता विभागाच्या वतीने प्रत्येक प्रभागात पथके तैनात करण्यात येणार असून विविध पदाधिकार्‍यांसमवेत या स्वच्छता मोहिमेत त्या स्वत: भाग घेतील, अशी माहिती नगराध्यक्षा रावल यांनी दिली आहे.