मुंबई: देशभरात कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. राज्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी होतांना दिसत आहे, मात्र आवश्यक ती सर्व खबरदारी घेतिली जात आहे. कोरोनाची रुग्णसंख्या कमी होताना दिसत असली, तरी संकट कायम असल्याने ३० नोव्हेंबरपर्यंत राज्यातील लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. मात्र ‘मिशन बिगिन अगेन’तंर्गत सुरू केलेल्या सर्व गोष्टी व सेवा पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहेत. राज्य सरकारने आज गुरुवारी हा निर्णय घेतला आहे.
राज्यात मार्चमध्ये करोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर रुग्णांची संख्या वाढत असल्यानं लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. काही महिने लॉकडाउन कायम ठेवल्यानंतर एक एक सेवा पूर्ववत सुरू केली जात आहे. यासाठी राज्य सरकारनं मिशन बिगिन अगेन (पुनश्च हरिओम) कार्यक्रम जाहीर करत टप्प्याटप्प्यानं सेवा सुरू करण्याच्या दिशेनं पावलं टाकली. राज्यातील अनेक सेवा व व्यवहार पूर्वीप्रमाणे सुरळीत सुरू झाले असले, तरी कंटेनमेंट झोन व करोना उद्रेक झालेल्या ठिकाणी लॉकडाउन कायम ठेवण्यात आलेला आहे.