३२ वर्षीय युवकाने राहत्या घरात घेतला गळफास

0

जळगाव : शहरातील शनिपेठेतील चौघुले प्लॉटमधील ३२ वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास घेत जीवनयात्रा संपविल्याची घटना पहाटे ६.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. दरम्यान युवकाने आत्महत्या का केली याबाबत कारण स्पष्ट झालेले नाही. या घटनेबाबत शनिपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संतोष हिम्मतराव सोनवणे (कुंभार) असे मयत युवकाचे नाव आहे. याबाबत पोलिस व प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेली माहिती अशी की, चौघुले प्लॉटमधील हनुमान मंदिराजवळील रहिवाशी संतोष सोनवणे हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांच्या वाहनावर चालक म्हणून कामाला होता.आठ दिवसापूर्वीच त्याने नोकरी सोडली होती. त्याने नुकतीच खानावळ सुरु केली होती.

संतोष हा गल्लीत मंडळात रात्री उशिरापर्यंत मित्रांसोबत दांडिया खेळत होता. त्यांची पत्नी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातच कामाला असल्याने त्या ड्युटीवर गेल्या होत्या. रात्री संतोष उशिरा घरी आला. संतोषची आई ही पहिल्या घरात झोपली होती. संतोषची मुलगी घरात झोपलेले असतांना त्याने साडीच्या साहाय्याने घरात गळफास घेवून आत्महत्या केली. यावेळी मुलगी उठल्यानंतर तिने आजीला आवाज दिला. संतोषच्या आईने खोलीत येवून पाहिल्यानंतर त्यांना धक्क्याच बसला. त्याच्या आईने आरडाओरड केल्यानंतर शेजारच्यांनी धाव घेतली. त्यानंतर त्याला तात्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणीअंती त्याला मयत घोषित केले.

जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ.खेताडे यांच्या खबरीवरून शनिपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्याच्या पश्‍चात आई, पत्नी, मुलगी, एक भाऊ, बहीणी असा परिवार आहे.