शांतता भंग करणे आम्हाला देखील येते: एमआयएम आमदार

0

मालेगाव: कर्नाटकमधील गुलबर्गा येथील आपल्या भाषणात एमआयएमचे नेते वारीस पठान यांनी वादग्रस्त विधान केले होते. त्या पाठोपाठ मालेगावचे आमदार मोहम्मद इस्माइल यांच्या भाषणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत मोहम्मद इस्माइल म्हणतात की, शहरात गोळीबार झाला तरी गुन्हा दाखल का केला जात नाही? आम्ही शांतता ठेवतो तसेच जर आमच्या अंगावर कोणी येत असेल शांतता भंग करणे हे देखील आम्हाला येतं. आम्ही हातात बांगड्या भरल्या नाहीत असा इशारा एमआयएमचे आमदार मोहम्मद इस्माइल यांनी दिला आहे.

वारिस पठाण यांच्या विधानानंतर मोहम्मद इस्माइल यांनी केलेल्या विधानाचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. तसेच शहरात काय परिस्थिती आहे याची आम्हाला कल्पना आहे, शहरात शांतता राहावी यासाठी आम्ही पुढाकार घेतो, शहरावर संकट येतं तेव्हा आम्ही पोलिसांच्या आधी पोहचतो, लोकांना शांत करतो, त्याचसोबत हा आमचा प्रामाणिकपणा आहे म्हणून शांत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

या व्हिडीओवर स्पष्टीकरण देताना मोहम्मद इस्माइल यांनी सांगितले की, मी केलेले वक्तव्य महाराष्ट्राशी अथवा देशाशी निगडीत नाही तर शहरासंदर्भात आहे. गोळीबारीची घटना आमच्या समर्थकांच्या घराजवळ करण्यात आली. याबाबत मी शांतता राखण्यासाठी पोलिसांची मदत करतो पण अशाप्रकाराने शांतता भंग होऊ शकते असं स्पष्टीकरण दिलं आहे.