चाळीसगाव – तहसीलदार कचेरीच्या मागे मुद्रांक विक्रेत्यांची दुकाने आहेत. गेल्या दोन दिवसांपासून १०० रुपयांच्या स्टॅम्प चा कृत्रिम तुडवडा निर्माण झाला आहे त्यामुळे विद्यार्थी शेतकरी यांच्या गरजेतून आर्थिक गळचेपी सुरू असून काही मुद्रांक विक्रेत्याकडे स्टँप असूनही कोरा स्टँप मागणाऱ्या नागरिकांना ते जास्तीचे पैसे न दिल्याने नाकारले जात असल्याने या परिसराला गर्दी चे स्वरूप प्राप्त झाले आहे.
चाळीसगाव तालुक्यातील एकशे छत्तीस गावांतील ग्रामस्थांचा व शहरातील नागरिकांचा काहिनाकाही शासकीय लाभाच्या कामानिमित्त तसेच विदयार्थी पालकांचा दाखल्यासाठी मुद्रांक विक्रेत्यांशी संबंध येतो. सद्यस्थितीत शाळा मध्ये विविध दाखल्याची निकड असल्याने व शेतकऱ्यांना कृषी विभागातील अनुदानासाठी व बँकेच्या कर्जप्रकरणासाठी १००रुपयांचा स्टँप लागतो आहे. यासाठी ग्रामीण भागातील शेतकरी व महिला सकाळी दहा वाजता तहसीलदार कार्यालयामागे गर्दी करतात त्याच्या कामाची गरज व अडाणीपणाचा फायदा घेत काही मुद्रांक विक्रेत्यांनी कोरा शंभर रुपयांचा स्टँप चक्क एकशे दहा ,एकशेवीस, व एकशे तीस रुपयांना विकण्याचा घाट घातला आहे त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट असून प्रशासन हतबल असल्याचे गंभीर चित्र या भागात दिसून येत आहे.
काही मुद्रांकविक्रेत्यांचा कृत्रिम तुटवडा
सध्या शालेय विद्यार्थ्यांना जातीचा व उत्पन्नाचा दाखला जमा करावयाचा आहे त्यासाठी पालकांची गर्दी होते आहे तर बोन्डअळीच्या व कृषी विभागातील इतर अनुदानाकरीता शेतकरी बांधव व महिला शंभर रुपयांचा कोरा स्टँप घेण्यासाठी गर्दी करीत आहे मात्र राजू पिंपळे ,शरद साखरे, पी एन जाधव नागेश आवटे व एकदोन मुद्रांक विक्रेते १०० रुपयांचा कोरा स्टँप त्वरित उपलब्ध करून देत आहे, मात्र इतर काही विक्रेते कोरा स्टँप देताना अक्षरशःदहा ते तीस रुपये जास्तीचे आकारत आहेत मुद्रांक विक्रेते हे कोषागार कार्यालयातून स्टँप मिळत नाही असे कारण पुढे करून गरजवंताला लुबाडत आहेत तर नागरिक ही जास्तीचे पैसे देऊन मला स्टँप मिळाल्यातच धन्यता मानीत आहेत नागरिकांसह ,दस्तलेखक यांनाही या कृत्रिम तुडवड्याचा भुर्दंड बसत आहे मुळातच स्टँप वाढीव किमतीला मिळत असल्याने दस्तलेखक यांना नागरिक लेखन फी देतांना घासाघीस करीत असल्याचे दिसून येत आहे. शंभर रुपयांच्या स्टँप लिहून दीडशे रुपये मुकाट्याने नागरीक देतात त्यामुळे कोरा स्टॅप असूनही काही मुद्रांक विक्रेते देत नसल्याने ठराविक मुद्रांक शुल्क विक्रेत्यांकडे गरजवंताच्या रांगा दिसून येत आहे आम्हाला कोरा स्टँप विकणे परवडत नाही, या हमाल्या कोण करेल अशी उलटसुलट उत्तरे नागरिकांना मुद्रांक विक्रेत्यांकडून ऐकावी लागत आहे.
वरिष्ठांकडून स्टिंग ऑपरेशनची गरज
आपले काम होण्याच्या भावनेतून नागरिक मुकाट्याने हा आर्थिक भार सहन करीत असून आपले काम मार्गी लागत असल्याने खेडोपाडी चे नागरिक ही मुस्कटदाबी सहन करीत आहे सोमवारी तर काही गरजू नागरिक स्टॅप घेण्यासाठी कोषागार कार्यालयात गेल्याची घटना घडली होती पाचशे रुपयांची स्टँप दोन तीन मुद्रांक विक्रेते ठेवीत असतात, मात्र शंभर रुपये किमतीचे स्टँप मोठ्या प्रमाणावर असूनही फक्त कोरा मागणार्ऱ्यांना नाकारला जातो आहे.
तक्रारी आल्याने दिली सक्त ताकीद – संजय बागुल
नागरिकांकडून जास्तीचे पैसे घेऊन स्टँप दिल्याच्या तोंडी तक्रारी आल्या आहेत यासाठी नुकतीच नोटीस काढून सर्वच मुद्रांक विक्रेत्यांना अंतिम सूचना दिली आहे कोणीही असे अतिरिक्त पैसे घेतल्याची लेखी तक्रार नोंदवली तर लागलीच दखल घेत चौकशीअंती संबधीत मुद्रांक विक्रेत्यांचा परवाना निलंबनाची कारवाई केली जाईल अशी माहिती नोंदणी व मुद्रांक विभागाचे सहाय्यक दुय्यम निबंधक वर्ग२ संजय बागुल यांनी जनशक्ती ला दिली आहे