४० लाख घेऊन आलेल्या राष्ट्रवादीच्या माजी आमदाराची चौकशी!

0
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संदीप बाजोरिया यांना मुंबई विमानतळावर आयकर विभागाच्या पथकाने पकडले. बाजोरिया यांच्याकडे ४० लाख रुपयांची बेहिशोबी रोकड सापडली असून ती आयकर विभागाने जप्त केली आहे. या पैशांचा स्त्रोत सांगू न शकल्याने ही रक्कम जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. बाजोरिया यांचा जबाब नोंदवल्यानंतर त्याला सोडून देण्यात आले आहे. दरम्यान बाजोरिया यांनी हे पैसे मी घराच्या व्यवहारासाठी बँकेतून काढले असल्याचे सांगितले आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश देण्यात आल्याने बाजोरिया याना पुन्हा चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बाजोरिया हे नागपूरहून मुंबईला येत होते. नागपूरला सीआयएसफच्या जवानांना त्यांच्या बँगेमध्ये मोठ्या प्रमाणावर नोटा ठासून भरल्याचे दिसले होते. मात्र नोटांमुळे कोणताही धोका नसल्याने आणि कारवाई करण्याचे सीआयएसएफला अधिकार नसल्याने जवानांनी बाजोरिया यांना जाऊ दिले होते. मात्र सीआयएसएफने याबाबत मुंबईतील विमानतळावरील अधिकाऱ्यांना आणि आयकर विभागाला कल्पना दिली होती की बाजोरिया यांच्याकडे कमीतकमी २५ लाख रूपये आहेत. या सूचनेच्या आधारावर बाजोरिया यांना ताब्यात घेण्यात आले आणि त्यांच्याकडील रोकड जप्त करण्यात आली. चौकशीनंतर बाजोरिया यांना जाऊ देण्यात आले.
बाजोरिया यांनी सांगितलं की त्यांच्याकडे सापडलेली रक्कम ही वैध असून ते वरळीतील एका घराच्या व्यवहारासाठी चालले होते. या व्यवहारासाठी आपण ही रक्कम काढली होती आणि ही रक्कम बँकेतून काढल्याचे आपल्याकडे पुरावे आहेत असे त्यांनी सांगितले.   आपल्याकडे असलेले सगळे पुरावे आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. मेसर्स बाजोरिया कन्स्ट्रक्शनच्या आर्थिक उलाढालींची आयकर विभाग तपासणी करीत आहे. त्याच्याशी या रकमेचा काही ताळमेळ बसतोय का हे आयकर विभागाचे अधिकारी तपासत आहेत. महाराष्ट्रातील सिंचन घोटाळ्यामध्ये संदीप बाजोरिया यांचंही नाव असून त्यांच्याविरूद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केलेला आहे.