५०० सीताफळाची झाडे केली ‘माती’मोल!

0

जळगाव जिल्ह्यातील पिडीत शेतकऱ्याची मदतीसाठी मुख्यमंत्र्यांकडे याचना

मुंबई:- जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील सीताफळाच्या जवळपास ५०० झाडांवर लघुसिंचन विभागाने नाला खोलीकरण करताना माती टाकून ती झाडे मातीमोल केली आहेत. मनोज निंबा शिरुडे असे या पिडीत शेतकऱ्याचे नाव आहे. सीताफळाच्या झाडांचे नुकसान झाल्यामुळे नुकसानभरपाई मिळावी यासाठी स्थानिक स्तरावर प्रयत्न करूनही मदत न मिळाल्याने त्यांनी मंत्रालयात येऊन मुख्यमंत्र्यांना साकडे घातले आहे. ५०० झाडे मातीमोल झाल्याने त्यांचे जवळपास ५ लाखांचे नुकसान झाले असून वर्षाला ३० हजारापेक्षा जास्त उत्पादन शिरुडे यांना मिळत होते.

३१ जानेवारी २०१७ रोजी लघुसिंचन विभागाने नाला खोलीकरण करताना झाडांवर माती टाकून सगळी झाडे मोडून काढली असल्याने शिरुडे यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे. याबाबत आधी तहसीलदार तसेच कृषी विभाग, सिंचन विभाग अभियंता यांना भेटून देखील निवेदन दिले आहे. मात्र अद्यापही कुणीही याची दाखल घेऊन पंचनामा देखील केलेला नाही. त्यामुळे शिरुडे यांनी सरळ मंत्रालयात येऊन मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे. या प्रकरणी लाखोंचे नुकसान झाले असून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शिरुडे यांनी केली आहे.