राष्ट्रवादी काँग्रेसचे सोशल मीडिया द्वारे नवे आंदोलन
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ५६ इंचाची छाती असल्याचे सांगणाऱ्या पंतप्रधानांसाठी ‘जवाब दो’ ही मोहिम सुरु करण्यात आली असून सोशल मिडियाच्या माध्यमातून ५६ सवाल सरकारला विचारणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
केंद्र आणि राज्यसरकारला जवळपास साडेचार वर्षे झाली असून आतापर्यंत दिलेली आश्वासने देण्यात आली होती. परंतु ही आश्वासने पूर्ण केलेली नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने ५६ इंचाच्या पंतप्रधानांसाठी ५६ सवाल मोहिम ५ सप्टेंबरपासून सुरु करण्यात आली आहे. सोशल मिडियाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या ट्वीटर अकाऊंटवरुन हे सवाल सरकारला केले जाणार आहेत. कालपासून हे सवाल विचारण्यास सुरुवात झाली आहे. याशिवाय फेसबुक अकाऊंटवरही हे सवाल केले जात आहेत. जनतेच्या मनातील प्रश्न आम्ही पक्षाच्या माध्यमातून सरकारला करणार असून रोज एक सवाल विचारला जाणार आहे असेही नवाब मलिक यांनी सांगितले.
हे देखील वाचा
तिजोरीची लूट थांबवावी
बहुतांश राज्यात भाजपची सरकारे असून भाजपने ठरवलं तर जीएसटीच्या कक्षेत पेट्रोलियम प्रोडक्ट टाकता येवू शकते. परंतु सरकारने तिजोरीची लूट करायचे ठरवलेच आहे त्यामुळे ही लूट तात्काळ थांबवावी आणि लवकरात लवकर निर्णय घ्यावा व लोकांना दिलासा दयावा अशी मागणी मलिक यांनी केली. देशात आणि राज्यात पेट्रोल-डिझेल आणि गॅस दरवाढीबाबत सरकार देत असलेला खुलासा लोकांची दिशाभुल करणारा आहे. केंद्र आणि राज्यसरकार याआडून लोकांची लूट करत असल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला. आंतरराष्ट्रीय भाव वाढतात त्यावेळी दरवाढ होते असे सरकारकडून सांगितले जात आहे परंतु सरकार लोकांची दिशाभूल करत आहे. आमच्या सरकारच्या काळात एक्साईज डयुटी प्रतिलिटर पेट्रोलवर ८ रुपये होती आज ती १९.४८ पैसे तर डिझेलवर एक्साईज डयुटी प्रतिलिटर ३ रुपये होती आज ती १५ रुपयांनी वाढली आहे असेही नवाब मलिक म्हणाले.