नेरुळ-: सध्या तरुण पिढी ही सोशल मीडियावर गुंतलेली पाहायला मिळत आहे.प्रत्येकाच्या हातात आलेल्या महागड्या मोबाईल्सवर तासनतास गुंतलेले हे तरुण मात्र सामाजिक भान हरपलेले पाहायला मिळतात.व्हाट्सअँप, फेसबुक,ट्विटर किंवा मोबाईल वरील गेम्स खेळण्यात हल्लीची तरुणाई आपले आयुष्य खर्ची घालत आहेत.समाजप्रति असलेली बांधिलकी, प्रेम किंवा आस्था कुठेतरी हरवत चालली आहे का? असा प्रश्न मात्र या पिढीकडे पाहिल्यावर पडतो.समाजप्रति काही करायचं असल्यास व्हाट्सअँप किंवा फेसबुकवर एखादी पोस्ट टाकायची किंवा फोटो टाकायचा आणि किती कॉमेंट्स आणि लाईक्स आले यावरून समाधान मानायचं यातच आपलं देश प्रेम आणि सामाजिक बांधिलकी दर्शवायची मात्र यात वेगळा ठरतोय तो कळंबोली येथे राहणारा तरुण जयेश निकम.जयेश हा १९ वर्षांचा असून तो नेरुळ येथील एस.आई.ई.एस या महाविद्यालयात बी.एम.एस च्या पहिल्या वर्षात शिकत आहे.जयेशने तरूणपिढीसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे.
सीमेवर लढणाऱ्या आणि शाहिद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबांना मदत मिळावी याचे आवाहन करत फिरत असतो.”सैनिकांचे कुटुंब हेच माझे कुटुंब” असे मानून सुट्टीच्या दिवशी दररोज ५ तास हातात बोर्ड घेऊन येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक नागरिकाशी, विद्यार्थ्यांशी हा मुलगा बोलतो त्यांना सैनिकांबद्दल सांगतो, शाहिद झालेल्या कुटुंबांविषयी मदतीचे आवाहन करतो. जयेशला याबाबत विचारले असता, जयेश सैनिकांप्रति भरभरून बोलत होता.त्याच्या बोलण्यात सानिकांप्रति असलेली तळमळ जाणवत होती.
जयेशने या उपक्रमाला दिवाळीच्या सुट्टीत सुरवात केली
जयेश म्हणतो,की मी इंटरनेटवर सर्च करायचो,बातम्या पाहायचो यात आपल्या सैनिकांबद्दल शाहिद होण्याच्या बातम्या आल्या की मन दुखी व्हायचे.त्यांच्या कुटुंबियांचा आक्रोश पहिला त्या सैनिकांच्या लहान लहान मुलांकडे रडताना पाहून मन कोलमडून पडत होते.तेव्हा माझ्या मनात सैनिकांच्या कुटुंबासाठी काहीतरी करायची इच्छा जागृत झाली.यासाठी बराच विचार केला.बऱ्याच जणांना विचारलं.पण कुठूनही माहिती मिळत नव्हती.परिसरातील वरिष्ठ नागरिकांना देखील विचारलं.शेवटी माझं बँक खाते ज्या बँकेत आहे तेथून मला सैनिकांसाठी सरकारतर्फे मदतीचे खाते असल्याची काही जुजबी माहिती मिळाली.त्याचा संदर्भ घेऊन इंटरनेटवर शोधलं तेव्हा सैनिकांच्या कुटुंबासाठी वेल्फेअर फंड असतो हे समजले.त्यासाठी सरकारनी बँकेत खाते सुरु केले आहे हे समजले.त्या खात्यात आपण केव्हाही मदत म्हणून पैसे देऊ शकतो अशी माहिती मिळाली. यावर माझ्या मनात कल्पना आली,की आपण निदान लोकांच्या मनात सैनिकांच्या कुटुंबियांबद्दल काही आत्मीयता निर्माण करू शकतो;मग दिवसातले ५ तास मी कुठेही गर्दीच्या ठिकाणी लोकांमध्ये फिरून त्यांना माहिती द्यायला सुरुवात केली.पहिली सुरुवात ही माझ्या घरापासून केली.यावेळी आम्ही दिवाळी साजरी न करता फक्त एक दिवा लावला आणि जो खर्च दिवाळीसाठी येतो ते सर्व रुपये आम्ही सैनिकांच्या वेल्फेअर फंडाला दिले. जयेशनी याबाबतीत आपल्या मित्रांनाही सांगितले; मात्र जयेशच्या कोणत्याच मित्रांनी याबाबतीत उत्सुकता दाखवली नाही उलट आम्हाला सुट्टी मिळाली आहे ती मजेत घालवायची आहे असे सांगितले.जयेशने मात्र यावर नाराज न होता आपल्या आई-वडिलांना याबतीत सांगितले.आई-बाबांनी मात्र जयेशच्या या विचारांना पूर्ण पाठिंबा देत प्रोत्साहन दिले.उलट हा उपक्रम करताना तुला सकारात्मक आणि नकारात्मक किंवा सकारात्मक असे दोन्ही प्रकारचे लोक भेटतील मात्र तू खचू नकोस असे प्रोत्साहन देऊन आत्मविश्वास वाढवला.
जयेशनी या उपक्रमाला सुरुवात केली ती वाशी,सी.एस.टी, मरीन ड्राईव्ह या ठिकाणी.दिवसातले ५ तास तो हातात बोर्ड घेऊन गर्दीच्या ठिकाणांवर फिरतो.जयेश प्रत्येक नागरिकाला आपल्याकडे १५ सेकंद आहेत का? असे विचारून थांबवतो.१५ सेकंद म्हंटल्यावर कोणीही सहज थांबतं कितीही घाईत असलेला माणूस वेळ देतोच.जयेश चे सैनिकांप्रति आत्मीयतेने बोलणे एकूण १५ सेकंदांची २ मिनिटे कधी होतात ते काळातही नाही.त्यावर मी त्यांना सैनिकांसाठी त्यांच्या कुटुंबियांसाठी मदतीचे आवाहन करतो.यावर कित्येकजणांनी मला काही पैसे वगैरे घेतोस का? असे प्रश्न विचारले.मात्र मी त्यांना नम्रपणे नाही असे सांगून त्यांना सरकारची सैनिकांबद्दलची योजना सांगतो.खात्री पटण्यासाठी आपण गूगलवर जाऊन चौकशी करू शकता असे जयेश सांगतो.तसेच या उपक्रमावर बोलताना जयेश मराठी, हिंदी, इंग्रजी अशा तीनही भाषा वापरतो.त्यामुळे त्याला भाषेची अडचण येत नाही. सध्या झालेल्या दिवाळीच्या सुट्टीत जयेश ने १८ दिवसांत तब्बल १४०० हुन अधिक नागरिकांशी संपर्क साधून मदतीचे आवाहन केले आहे.हे कार्य अभ्यासातून मिळणाऱ्या वेळेत सुद्धा सुरूच आहे.यात त्याला काही सकारात्मक तर काही नकारात्मक अनुभव देखील आले.
काही जणांनी त्याच्या कार्याची हेटाळणी केली.तर काही जण असे भेटले की त्यांनी त्याला आशीर्वाद आणि शुभेच्छा देखील दिल्या.जयेशला वाशीला असा उपक्रम राबवताना काही एम.बी. ए झालेली मुले भेटली होती.त्यांना जयेशनी अगदी उत्तम प्रकारे माहिती दिली.यावर या सर्व मुलांनी त्याचे अभिनंदन करून त्याला सांगितले,कि तू इतक्या कमी वयात एवढं आत्मविश्वासाने बोलतोयस तेवढं आम्ही आत्तासुद्धा बोलू शकत नाही.तसेच त्या मुलांनी नक्की सैनिकांना मदत देण्याचे आश्वासन देखील दिले.तर सी.एस.टी येथे एक वृद्ध दाम्पत्य आपल्या नातवाबरोबर जात असताना जयेशच्या हातातला बोर्ड पाहून थांबले.त्यावेळेस त्या दमपत्याने जयेशच्या कार्याला शुभेच्छा तर दिल्याचं आणि सांगितले की आमचा मुलगा देखील सैन्यात आहे. तू जे या वयात कार्य करत आहेस ते खरोखर वाखाणण्याजोगे आहे.प्रत्येक भारतीयाने हे करायला हवे.त्या सैनिकाच्या मातेच्या डोळ्यात उभे राहिलेले अश्रू पाहून जयेशचा आत्मविश्वास वाढला असेल हे नक्कीच.काही जणांनी तर या कार्यबद्दल तुला मोदी सरकारने सत्कार करायला हवा असे देखील सांगितले. तर काही जणांनी थांबल्यावर संशयतेने पाहून पैसे वगैरे तर गोळा करत नाही ना असे देखील विचारले होते.जयेश सांगतो की,मला पैसे गोळा करता आले असते,परंतु हल्ली कॅन्सर पेशंटच्या मदतीखाली पैसे उकळणाऱ्या संघटना वाढल्या आहेत.त्यांना अटकसुद्धा झाली आहे.त्यामुळे मी फक्त जनजागृती करतो आणि सैनिकांसाठी असलेल्या योजनेची माहिती देतो जयेशचे सध्या कॉलेज सुरु असल्याकारणाने तो शनिवार आणि रविवार किंवा सार्वजनिक सुट्ट्या वाया न घालवता ५ तास सैनिकांसाठी देतो. जयेशच्या या उपक्रमाचे कौतुक त्याच्या कॉलेज,मित्रांमध्ये आणि परिसरातही होऊ लागले आहे.कॉलेजमध्ये जयेशनी ही गोष्ट मुख्याध्यापकांना सांगितल्यावर त्यांनी देखील या उपक्रमाचे कौतुक करून प्रत्येक वर्गात जाऊन हा उपक्रम राबवण्याची परवानगी दिली आहे. मात्र जयेश म्हणतो की,मी आता कोणालाही माझ्यात सामील व्हा असे सांगत नाही.मी फक्त जनजागृती करतो आणि जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. जयेशला काश्मीरमध्ये जाऊन काहीतरी सैन्यासाठी करायचे आहे.त्यासाठी तो प्रयत्न करणार आहे.तसेच जयेशला निसर्गाची,खेळाची आवड आहे.त्याच्या प्रत्येक वाढदिवसाला केक वगैरे न कापता तो विविध झाडांची रोपे लावतो. जयेश म्हणतो की आपल्या देशासाठी लढणाऱ्या सैनिकांसाठी काहीतरी करायला हवे.हे प्रत्येक नागरिकाची जबादारी आहे.सैनिक आहेत म्हणून आपण या देशात सुखाची झोप घेत आहोत.आपल्या परीने सैनिकांसाठी काहीतरी करण्याचे आवाहन जायेश करतो.सैनिकांवर समाजमध्यमांवर केल्या जाणाऱ्या विनोदांवरसुद्धा जयेश नाराजी व्यक्त करतो.असे विनोद मुळात तयारच होता काम नयेत असे त्याचे म्हणणे आहे. आजची तरुणपिढी समाजमाध्यमांवर सैनिकांना श्रद्धांजली वाहताना जयेश सारखे तरुण मात्र खऱ्या अर्थाने सामाजिक जाणिवेतून आणि समाजकार्यातून देश सेवा करत आहेत हीच त्यांच्या कार्यातून सैनिकांना वाहिलेली खरी श्रद्धांजली ठरत आहे.