सातारा-छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोणत्याही जुन्या वास्तूंमध्ये नवीन काही बांधण्याचा आपल्याला अधिकार नाही. आपल्या लोकांना व बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना छत्रपतींच्या इतिहासाची माहिती व्हावी म्हणून रायगड किल्ल्या खाली ८८ एकर जमीन संपादित केली असून तिथे नवीन रायगड उभारण्यात येईल, असे सांगत रायगडाला हात न लावता छत्रपतींचा इतिहास पुन्हा जिवंत करू, अशी ग्वाही खासदार संभाजीराजे यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३४५ वा राज्याभिषेक दिन सोहळा आज (बुधवार) रायगडावर पार पडत आहे. त्यावेळी ते उपस्थितांसमोर बोलत होते.
ते म्हणाले, रायगड किल्ल्याच्या पायथ्याला जिजाऊंच्या वाड्याजवळ ८८ एकर जमीन संपादित केली आहे. तेथील काही जागेवर रायगड उभारले जाईल. तिथे आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही. रायगडावर ज्या गोष्टी करता येणार नाहीत. त्या आपण तिथे उभा करूयात. इतिहासकारांना, संशोधकांना त्यांच्याकडील पुरावे, स्केचेस, छायाचित्र देण्यासाठी पत्रे लिहिली आहेत. आपण ते रायगड प्राधिकरणाला देऊयात. ही संधी सर्वांना आहे, सगळ्यांनी यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले.
तत्पूर्वी, होळीच्या माळावरून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिकात्मक मूर्तीची पालखीमधून मिरवणूक काढून वाजत-गाजत राजसदरेवर आणण्यात आली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे यथासांग, मंत्रोच्चारात संभाजीराजे यांच्या हस्ते पूजन करुन महारांजाच्या मूर्तीला राज्याभिषेक करण्यात आला. राज्यभिषक सोहळ्यासाठी लाखो शिवभक्त किल्यावर आले आहेत. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ या घोषणांनी परिसर दणाणून गेला आहे. शिवराज्यभिषक सोहळा पाहण्यासाठी शिवभक्तांची अलोट गर्दी झाली आहे.