पुणे: राजस्थानातील नागौर-जोधपूर राष्ट्रीय महार्गावरील नागडी गावाजवळ ट्रकने दिलेल्या धडकेत ॲग्रोवनचे आर्टिस्ट प्रवीण ताकवले (वय ३०) यांचे मंगळवारी रात्री अपघाती निधन झाले. या अपघातीत त्यांचा जागीच मृत्यू झाला. प्रवीण काश्मीर ते कोल्हापूर या सायकल भ्रमंती मोहिमेदरम्यान राजस्थानात गेले होते.
प्रवीण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जम्मू येथून १३ ऑगस्ट रोजी काश्मीर ते कोल्हापूर सायकल मोहिमेला सुरूवात केली होती. या मोहिमेत एकूण आठ सायकलस्वार सहभागी होते. ते मंगळवारी बिकानेरहून जोधपूरला जाताना हा अपघात झाला. प्रवीण आणि त्यांचे तीन सहकारी रात्री नागडी गावाजवळील एका हॉटेलमध्ये जेवण करून पेट्रोलपंपावर ठेवलेल्या सायकली आणण्यासाठी चालत निघाले होते. तेव्हा एका भारदस्त ट्रकने प्रवीण यांच्यासहित त्यांच्या चार साथीदारांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की यात प्रवीण यांचा जागीच मृत्यू झाला तर इतर तीन जण जखमी झाले आहेत. उपस्थितांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिन्ही जखमींना उपचारासाठी जवळच्या खिंवसर रुग्णालयात दाखल केले.