मुंबई : सध्या देशभरात जीएसटीचा गाजावाजा चालला आहे. देशभरात उद्यापासून ऐतिहासिक जीएसटीही नवी करप्रणाली सुरु होणार आहे. या नव्या कर प्रणालीत लघु उद्योगांना चालना मिळणार असून देशी उत्पादनांचा व्यापार वाढणार असल्याचे केंद्रीय अतिरिक्त अबकारी कर आयुक्त सुरेंद्र मानपुस्कर यांनी जनशक्तिशी बोलताना सांगितले.
राज्यातील कोल्हापुरी चप्पल आणि मराठवाड्यातील पैठणी या उद्योगालाही जीएसटीमुळे चालना मिळून हि उत्पादने देशभरात एकाच किमतीत मिळणे शक्य होणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. केंद्र सरकारने अतिशय संयमी भूमिकेतून जीएसटी कायदा केला आहे. जीएसटी परिषदेचे अध्यक्ष केंद्रीय अर्थमंत्री असले तरी या परिषदेचे सर्वाधिक सदस्य हे राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत, असे ते म्हणाले.
देशी उत्पादनांना जीएसटीमध्ये अतिशय सवलत देण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. देशी उत्पादकांच्या २० लाखांच्या आता असलेल्या उलाढालीवर सरकारने कोणताही टॅक्स लावला नाही. तर ७५ लाखांच्यवर उलाढाल असल्यास तीन महिन्यात केवळ एकदाच एक टक्का कर भरावा लागणार आहे. अनेक वेळा एका राज्यात उतपादित झालेल्या वस्तूला देशातल्या इतर राज्यात वेगवेगळा कर भरावा लागत होता. मात्र आता त्या उत्पादनाला देशातल्या कोणत्याही भागात एकाच कर आणि प्रवेश शुल्क लागू केल्याने देशी उत्पादनांचा व्यापार वाढेल असाही मानपुस्कर यांनी म्हटले आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक वस्तू देशी वस्तूंपेक्षा स्वस्त मिळतात ,त्यामुळे भारतीय वस्तूंकडे ग्राहक पाठ फिरवत होते . मात्र देशी उद्योगांना चालना देण्यासाठी अशा वस्तूंवर ५ टक्के आयात शुल्क वाढवण्यात आल्याचे मापुस्कर यांनी सांगितले . केंद्र सरकारच्या या भूमिकेमुळे भारतीय वस्तू आणि स्वस्त मिळणाऱ्या विदेशी उत्पादनाच्या किमतीत फारसा फरक राहणार नाही, असेही मानपुस्कर यांनी स्पष्ट केले.