​देवेंद्र फडणवीस सरकार निकम्मे!

0
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा घणाघात
राज्याला वेगळा गृहमंत्री देण्याची केली मागणी
अहमदनगर :- महाराष्ट्रात बिहार पेक्षा जास्त वाईट परिस्थिती असून राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकार निकम्मे असल्याचा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. राज्याला स्वतंत्र गृहमंत्री हवा असल्याची मागणी देखील ठाकरे यांनी केली. ठाकरे यांनी अहमदनगर येथे शिवसेना कार्यकर्त्यांच्या हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर भेट घेतली. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. अहमदनगरमधील शिवसैनिकांच्या हत्येचा खटला उज्ज्वल निकम यांनी लढवावा, मी स्वत: निकमांना कॉल केला होता असेही ठाकरे यावेळी म्हणाले. गुंडाना पक्षात घ्या आणि सत्ता स्थापन करा असा मूलमंत्र घेऊन सत्ता स्थापन केली असेल तर या देशाला अच्छे दिन येतील असे वाटत नाही, असा आरोप देखील ठाकरे यांनी यावेळी केला
दोषींना पाठीशी घालण्याचे प्रयत्न जर सरकारकडून होत असतील तर आम्ही कायदा हातात घेऊ. शिवसैनिकांचा हात अजून उठलेला नाही, जर तो उठला तर नामर्दांच्या अवलादीला ठेचून काढू असे सांगत एखाद्या गुंडाला जर शिवसैनिकांनी ठेचून मारला तर मग आमच्यावर गुन्हे दाखल करू नका ती जबाबदारी या यंत्रणेची असेल, असेही ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी त्यांचा अधिकार वापरावा आणि आरोपींना फासावर चढवावे अशी मागणी करत हत्या झालेल्या ठुबे आणि कोतकर यांच्या कुटुंबांची जबाबदारी आम्ही घेतली आहे, या कुटुंबांना संपूर्ण ताकद शिवसेना देईल, असे ठाकरे यांनी सांगितले.
ठाकरे म्हणाले की, आरोपी कोणत्याही पक्षाचे असो त्यांना शासन झालेच पाहीजे. लोकांवर दबाव टाकला जात आहे, असेच जर होत असेल तर आम्हाला इथे येऊन ठाण मांडावे लागेल आणि ही गुंडागर्दी मोडून काढावी लागेल. कृष्णप्रकाश यांच्यासारख्या अधिकाऱ्यांना इथे आणले पाहीजे, अशी मागणीही त्यांनी केली. गृहखात्याला वेगळा मंत्री द्यायला हवा, या हत्याकांडाचा तपास हा निष्पक्षपातीपणे व्हायला हवा, असेही ठाकरे म्हणाले.