दोन घरांचे झाले नुकसान, वृध्देसह गुरेढोरांना दुखापत
आंबाफळी परिसरात चक्रीवादळाचे थैमान
लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज
नवापूर : तालुक्यातील झामणझर येथील आंबाफळी परिसरात चक्रीवादळाने थैमान माजवून अनेक घरांचे नुकसान केल्याची घटना शनिवारी, 20 रोजी दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास घडली. त्यात सत्ता दसर्या गावित आणि धीरुभाई सत्ता मावची यांच्या घरावरील सर्व सिमेंट पत्रे, दांड्या उडून नुकसान झाले आहे. सुदैवाने, या भागात घरे कमी असल्याने जास्त हानी झाली नसल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, 80 वर्षीय छगनीबाई दसर्या मावची यांच्या मानेला पत्रा लागून दुखापत झाली आहे. लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यासोबतच गुरेढोरांना किरकोळ दुखापत झाली आहे. अद्यापपर्यंत कोणत्या अधिकार्यांनी घटनास्थळी भेट दिली नसल्याची माहिती मिळाली. परिसरातील ग्रामस्थांनी पाहण्यासाठी गर्दी केली होती.
चक्रीवादळ पंधरा ते वीस मिनिटे सुरु होते. ते गोल गोल आकारात फिरुन नंतर अदृश्य झाल्याचे सांगण्यात आले. हे चक्रीवादळ तेवढ्याच भागात होते. ते अन्यत्र पुढे राहिले असते तर शेतीसह जास्त वस्तीच्या भागांचे प्रचंड नुकसान झाल्याची शक्यता होती.
चक्रीवादळाने घरावरील दांड्या व सिमेंट पत्रे दूरपर्यंत उडाली आहेत. एका घराचे 40 सिमेंटचे पत्रे उडून नुकसान झाले आहे. पत्राचे अनेक तुकडे परिसरात विखुरलेल्या अवस्थेत दिसून आले. कोणाच्याही ध्यानीमनी नसतांना अचानक चक्रीवादळाने थैमान घालुन आदिवासी बांधवाच्या घरांचे नुकसान झाले आहे. शहरी भागात कडक ऊन असतांना ग्रामीण भागात वातावरण बदलून वादळ आले.
या घटनेची माहिती मिळताच पंचायत समितीचे उपसभापती दिलीप गावित, नवापूर तालुका काँग्रेस कमेटीचे उपाध्यक्ष आर.सी.गावित, पं.स.सदस्य जालमसिंग गावित यांनी घटनास्थळी जाऊन भेट दिली. तसेच परिसराची पाहणी केल्यावर ग्रामस्थांशी चर्चा करुन माहिती जाणून घेतली.