निवडणुकीच्या कामावरील बीएलओ चेतन पावरा यांचे अपघाती निधन

0

आयोगातर्फे परिवाराला मदत मिळण्यासाठी निवेदन
शहादा/नवापूर :
लोकसभा निवडणुकीच्या चिठ्ठया उशिरापर्यंत वाटप करून शहादा तालुक्यातील वीरपूर येथे 25 एप्रिल रोजी आपल्या दुचाकीने घरी परतणार्‍या बीएलओ चेतन हरसिंग पावरा यांचा अपघात होऊन त्यात त्यांचे निधन झाले.

शहादा तालुक्यातील वीरपूर येथील जि.प.च्या प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून 2014 पासून चेतन हरसिंग पावरा उपशिक्षक म्हणून कार्यरत होते. तसेच त्यांची नियुक्ती बीएलओ म्हणून त्याच गावी होती. अपघात झाल्यावर जागीच त्यांचा मृत्यू झाला. त्यातच त्यांचे दुर्भाग्य असे की, त्यांची नियुक्ती ही 2005 नंतरची असल्याने त्यांच्या कुटुंबाला त्यांच्यामागे कोणतीही पेन्शन नाही. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, आई-वडील असा परिवार आहे. तरी त्यांच्या कुटुंबास निवडणूक आयोगामार्फत योग्य ती मदत मिळावी, याकरिता महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन नंदुरबारमार्फत प्रातांधिकारी साताळकर आणि तहसीलदार मनोज खैरनार यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात नमूद आहे की, पावरा कुटुंबाची जी हानी झाली. ती भरून निघणे कदापी शक्य नाही. त्यांच्या कुटुंबाला लाभ मिळाल्यास भविष्यातील येणार्‍या आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होईल. यावेळी तहसीलदार यांनी कर्मचार्‍यांच्या कुटुंबास 15 लाखांपर्यंत मदत मिळू शकते, असे स्पष्ट केले. पुढील पाठपुरावा करण्याबाबत आश्वासन दिले. निवेदनावर जिल्हाध्यक्ष संदीप रायते, कोषाध्यक्ष संदीप रोकडे, तालुकाध्यक्ष आदिनाथ गोल्हार, विशाल सिसोदे, तुषार देवरे, उपेंद्र पाटील, वसावे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.