1 कोटी खर्चुन रस्त्याचे डांबरीकरण

0

अमळनेर । दरवर्षी पावसाळ्यात विप्रोजवळील रेल्वे पुलाखाली पाणी साचुन हा रस्ता वाहतुकीसाठी बंद होत असल्याने तांबेपुरा सानेनगर भागातील नागरिकांसह, बोरीकाठचे शेतकरी,विद्यार्थी व विप्रो कामगारांचे प्रचंड हाल होत असे. विप्रोत येणार्‍या वाहनांसाठी तर ते अडचणीचे ठरत होते. माजी नगराध्यक्षा भारती चौधरी व विद्यमान नगरसेवक नरेंद्र चौधरी यांनी यातून कायमचा मार्ग काढण्यासाठी सुमारे एक कोटी निधीतून तांबेपुरा ते प्रताप तत्वज्ञान पर्यंत पक्का डांबरी रस्ता निर्माण केल्याने हा रस्ता सर्वांसाठी वरदान ठरत आहे. नगरपरिषदेच्या माध्यमातून गेल्या 6 महिन्यांपूर्वी हा रस्ता पूर्णत्वास येऊन येथून एसटी बस, ट्रक व खाजगी वाहने जोमाने धावू लागली आहेत. सध्यस्थितीत या रस्त्याकडे जाऊन पाहिल्यास येथील वाहनांची प्रचंड वर्दळ पाहून हा रस्ता किती महत्वाचा होता याचा प्रत्यय अनेकांना येत आहे.

अनेक वर्षापासून होते प्रलंबीत
अनेक वर्षांपासून विप्रो बोगद्याची समस्या कायम असताना कोणीही लोकप्रतिनिधी लक्ष देण्यास तयार नव्हते. पावसाळ्यात पुलाखाली पाणी रहात असल्याने वाहने काढणे कठीण होत होते. प्रवासासाठी कच्या स्वरूपात असलेल्या बंगाली फाईल जवळील तसेच रेल्वेपुलावरील पर्यायी रस्त्याचा वापर करावा लागत असे. बोरी काठच्या अनेक गावांची बससेवा बंद रहात असल्याने शेतकरी, ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत असत तर दुसरीकडे विप्रो कंपनीत येणारी मालाची वाहने कंपनी पर्यंत पोहोचूच शकत नसल्याने विप्रोसाठी तर ही समस्या अतिशय कठीण ठरत होती.

कंपनी बंद पडण्याची होती भिती
खराब रस्त्याच्या समस्येला विप्रो प्रशासन अक्षरशः कंटाळले असल्याने काही अधिकार्‍यांनी तसा अहवाल वरिष्ठ अधिकार्‍याना पाठविला होता. प्रसंगी कंपनी बंद करण्याची तयारीही दर्शविण्यात आलेली होती. ही माहिती तत्कालीन नगराध्यक्षा भारती चौधरी व नरेंद चौधरी यांच्यापर्यंत पोहोचल्याने त्यांनी या विषयी मार्ग काढून रस्ता बनविण्यासाठी पाठपुरावा केला. आमदार शिरीष चौधरी यांच्या मार्गदर्शना मुळे आणि सहकार्याने तांबेपुरा ते प्रताप तत्वज्ञान मंदिरापर्यंत रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरणास मंजुरी मिळाली.

नवीन रस्ता दिर्घकाळ टिकण्याची अपेक्षा
1 कोटी निधीतून हा रस्ता पूर्ण करण्यात आला आहे. रस्त्याचे काम देखील उत्कृष्ट दर्जाचे असल्याने वाहनांची प्रचंड वर्दळ असली तरी हा रस्ता अनेक वर्ष टिकू शकेल असा अंदाज वर्तविण्यात आहे. रेल्वे पुलाजवळ पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु असल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद होऊन संपूर्ण नव्या पर्यायी रस्त्यावरुन वाहनांची वर्दळ सुरु आहे. हा रस्ता थेट प्रताप जवळील नव्या रेल्वे पुलाला जोडला असल्याने वाहनधारकांना अतिशय सोयीचे झाले आहे.

बंगाली फाईल भागात लहानाचा मोठा झाल्याने या ठिकाणी असलेल्या समस्येची जाण होती. समान्य नागरिकांना होणार्‍या त्रासातून पर्यायी रस्ता करावा हे स्वप्न मनाशी होते. सुदैवाने येथील जनतेने पत्नीच्या रूपाने नगरसेवक पदाची संधी दिली व आमदार शिरीष चौधरी यांच्या सहकार्याने नगराध्यक्ष पद मिळाल्याने त्यांच्याच मार्गदर्शनाने हा रस्ता निर्माण करून स्वप्नपूर्ती केली आहे.
– नरेंद्र चौधरी