1 ऑगस्टपासून वैद्यकीय प्रवेश सुरू

0

मुंबई : राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयातल्या प्रवेश प्रक्रियेला मंगळवारपासून सुरू होणार असून ती ३१ ऑगस्टपर्यंत चालेल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी सोमवारी विधान परिषदेत दिली. दुपारी याबाबतची बैठक झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राज्य सरकारने ३३ हजार कोटींपेक्षा जास्त रकमेच्या पुरवण्या मागण्या सादर केल्या आहेत. यावरील चर्चेच्या उत्तरात महाजन बोलत होते. रायगड जिल्ह्यातल्या पोलादपूर येथे आयुर्वेदिक महाविद्यालय चालू करण्यासाठी परवानगी देऊ असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. जिल्हा रूग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आले आहेत, असे सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सांगितले.

वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या वेतनवाढीसंदर्भात दोन्ही सभागृहांच्या सदस्यांची एक समिती नेमण्यात येईल व तीन बैठकांच्या कालबद्ध वेळेत यावर निर्णय घेतला जाईल, असेही ते म्हणाले. अंगणवाडी सेविकांना सेवाज्येष्ठतेनुसार मानधन देण्याचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे या सेविकांना दुसऱ्या टप्प्यात थेट त्यंच्या बँक खात्यात पगार जमा होईल, असे महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले. काही बालसदनांचे रूपांतर वसतीगृहात करावे, असा प्रस्ताव शिक्षण विभागाला पाठवण्यात आला आहे. तो मान्य झाल्यास त्यांना अनुदान मिळू शकेल, असेही त्या म्हणाल्या. मराठवाड्यात वॉटर ग्रीडला मंजुरी देण्यात आली आहे. याच्या निविदा आठ-दहा दिवसांत काढल्या जातील. त्यामुळे औरंगाबाद, सिल्लोडच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न निकाली निघेल, असे पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितले.

अन्न्सुरक्षा योजनेत काळाबाजार करणारे तसेच बोगस लाभार्थ्यांना रोखण्याची योजना आम्ही हाती घेतली आहे. काही ठिकाणी लाभार्थ्याचे ठसे जुळून येत नाहीत. त्यामुळे आता डोळ्यांची ओळख पटवण्याची पद्धत लागू करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी सांगितले. नॅशनल पार्कमध्ये दगडांच्या सहाय्याने फेरीचा धंदा करणाऱ्या आदिवासींना स्टॉल उभारून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी सांगितले. त्याआधी, जयंत पाटील, जोगेंद्र कवाडे, जनार्दन चांदुरकर, जगन्नाथ शिंदे, नीलम गोऱ्हे, हेमंत टकले, प्रवीण दरेकर, रामराव वडकुते, विक्रम काळे, प्रकाश गजभिये, दत्तात्रय सावंत, गिरीश व्यास आदींनीपुरवण्या मागण्यांवरील चर्चेत भाग घेतला.