नवी दिल्ली । ज्या मोबाईलधारकांनी अद्याप त्यांचे मोबाईल क्रमांक आधारशी लिंक केले नसतील, त्यांच्यासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. येत्या 1 जानेवारीपासून केवळ एका ‘ओटीपी’ क्रमांकाच्या आधारे आधार कार्ड मोबाईल क्रमांकाशी लिंक करता येणार आहे. आधार कार्ड लिंक करण्याची अखेरची मुदत 31 मार्चपर्यंत आहे. ‘ओटीपी’ आधारित ही व्हॉइस गाइडेड यंत्रणा अवघा शेवटचा दीडेक महिना शिल्लक असताना ग्राहकांच्या मदतीला धावून येणार आहे. युनिक आयडेंटिफिकेशन ऑथोरिटी ऑफ इंडिया (णखऊ-ख) आणि टेलिकॉम कंपन्यांच्या वादामुळे आणि संभ्रमामुळे हा विलंब झाला.
अद्याप 50 कोटी मोबाईल क्रमांक आधारशी लिंक नाहीत
मोबाईल क्रमांकांशी आधार कार्ड क्रमांक लिंक करण्याची प्रक्रिया मोबाईलधारकांनी मोठ्या प्रमाणावर सुरू केली. पण मोबाईल कंपन्यांच्या कस्टमर केअर सेंटरमध्ये जाऊन ही प्रक्रीया पूर्ण करणे कठीण जात असल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून येऊ लागल्या. अद्यापही 50 कोटी मोबाईलधारकांनी त्यांचे मोबाईल क्रमांक आधारशी लिंक केलेले नाहीत. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मोबाईल धारकांनी त्यांच्या मोबाईल क्रमांकांची पडताळणी केली नाही तर त्यांचे मोबाईल कनेक्शन बंद केले जाऊ शकतात. त्यामुळे ही नवी प्रक्रिया त्यांच्या मदतीला धावून येऊ शकते.
अन्य भाषांचा पर्याय
या प्रक्रियेत मोबाईलधारकाला इंटरॅक्टीव्ह व्हॉइस रिस्पॉन्स सिस्टीमला कॉल करावयाचा आहे. त्यानंतर हिंदी, इंग्रजी किंवा प्रादेशिक भाषेचा पर्याय निवडून, माहिती घेऊन ओटीपी जनरेट करता येईल. ओटीपी व्हेरिफाइड झाला की मोबाईल क्रमांक आधारशी जोडला जाईल. अन्य भाषांच्या वापराच्या पर्यायामुळे सर्वसामान्यांची सोय होणार असून इंग्रजीच्या सक्तीमुळे सर्वसामान्यांची होणारी गैरसोय यामुळे टळणार आहे.