जळोची: – पुणे जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळा यावर्षी 1 मार्च पासून सकाळी भरवण्याचा निर्णय घेण्यात, आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील यांनी दिली. पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या शिक्षणपरिषदेत केलेली घोषणा कार्यवाहीत आल्याने शिक्षकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे
जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीची सभा भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या सभागृहात आज (बुधवारी) जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व शिक्षण सभापती विवेक वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या सभेत 1 मार्चपासून सकाळी शाळा भरविण्याच्या शिक्षकांच्या मागणीबाबत चर्चा करण्यात आली. जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाची शिक्षण परिषद पुणे येथे शरद पवार यांच्या उपस्थित 21 जानेवारी संपन्न झाली होती. यावेळी मार्च महिन्यामध्ये सकाळी शाळा भरविण्याची मागणी करण्यात आली होती.
शालेय वेळेत एकसुत्रीपणासाठी
जिल्हाभरातील माध्यमिक व खासगी प्राथमिक शाळा मार्चमध्ये सकाळच्या सत्रात भरत असल्याने शालेय वेळेबाबत एकसुत्रीपणा ठेवण्याची मागणी करण्यात आली होती. जिल्हाभरात उन्हाची तिव्रता वाढली असून अनेक शाळांमध्ये पाण्याचे टंचाई जाणवत आहे. तर प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या वेळेत तफावत असल्याने पालक व विद्यार्थी यांचीही कसरत होत असे, त्यामुळे शालेय वेळेत एकसुत्रीपणा आणण्याची गरज होती, असे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे सरचिटणिस खंडेराव ढोबळे यांनी सांगितले.
निर्णयाचे स्वागत
1 मार्चपासून सकाळी शाळा भरविण्याचा निर्णय विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्यासह संपूर्ण प्राथमिक शिक्षणासाठी आनंददायी असून आता खासगी प्राथमिक, माध्यमिक व जिल्हापरिषद शाळा यामध्ये शालेय वेळेबाबत एकसुत्रीपणा राहील.जिल्हापरिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यासह सर्व पदाधिकारी यांचे जिल्हाभरातील शिक्षकांनी स्वागत केले आहे.
– बाळासाहेब मारणे
जल्हाध्यक्ष, शिक्षक संघ पुणे