1 हजार 342 विद्यार्थ्यांना ‘आरटीई’चे प्रवेश

0

पिंपरी-चिंचवड : ‘आरटीई’ प्रवेशाची पहिली फेरी संपुष्टात येऊन दुसर्‍या फेरीला सुरुवात झाली आहे. आरटीईच्या पहिल्या फेरीत पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत असलेल्या शाळांमधील राखीव जागांसाठी लॉटरी पद्धतीने निवडलेल्या अर्जातील केवळ 1 हजार 342 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. अद्यापही अडीच हजार जागा रिक्त असून, हजारो विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. आरटीईची प्रवेश प्रक्रिया सुरळीतपणे राबवून या प्रक्रियेतील गोंधळ दूर करावा, अशी मागणी पालकवर्गाकडून केली जात आहे.

पालकांची उडतेय तारांबळ
गरीब, वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना ‘आरटीई’नुसार 25 टक्के राखीव जागांवर प्रवेश दिला जातो. त्याअंतर्गत केंद्रीय प्रवेश पद्धतीनुसार जवळपास चार हजार अर्जांची ऑनलाईन नोंदणी झाली. यंदा चारवेळा प्रवेशाची मुदतवाढ दिल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश घेता आला. सध्या आरटीई प्रवेशाची दुसरी फेरी सुरू आहे; मात्र नेहमीसारखाच प्रवेश प्रक्रियेत भोंगळ कारभार सुरू आहे. शासनाच्या वेळापत्रकानुसार एकही फेरी वेळेवर होत नसल्याने पालकवर्गाची तारांबळ उडत असून, आपल्या पाल्याला प्रवेश मिळेल की नाही, आरटीई सोडून खासगी माध्यमाच्या दुसर्‍या शाळेत पाल्याचा प्रवेश करावा, अशा द्विधा मनस्थितीत पालक सापडले आहेत.

बहुसंख्य शाळांमध्ये मदत केंद्र नाहीत
आरटीई प्रवेश प्रक्रियेचा भोंगळ कारभार यंदाही सुरूच आहे. आरटीई प्रवेश प्रक्रियेच्या तारखांमध्येही एकवाक्यता नाही. वारंवार फेरीच्या तारखा पुढे ढकलल्या जात आहेत. त्याची सूचनाही पालकांना वेळेवर मिळत नाही. पालकांनाच शाळांमध्ये हेलपाटे मारून चौकशी करावी लागत आहे. दुसरीकडे, शाळांमध्ये मदत केंद्र नसल्यामुळे पालकांना प्रवेशाबाबत योग्य ते मार्गदर्शन मिळत नाही. शिक्षकवर्ग मुख्याध्यापकांना भेटू देत नाहीत. खासगी शाळा असल्यामुळे संस्था चालकांना भेटा, असे सांगितले जाते. ‘आरटीई’ची प्रवेश प्रक्रिया दहावी-बारावीच्या परीक्षेच्या वेळी सुरू असल्यामुळे पुरेसा कर्मचारी वर्ग नसतो. त्यामुळे पालकांना एका प्रवेशासाठी शंभर चौकशा कराव्या लागतात. त्यामुळे शिक्षण विभागाने आरटीई प्रवेश प्रक्रियेसंदर्भात ठोस भूमिका घेण्याची मागणी पालकवर्गाकडून होत आहे.