पोषण आहारातील नवीन घोळ; तांदूळ पुरवठा वेगळाच
जळगाव: जिल्ह्यातील शालेय पोषण आहार प्रकरण राज्यात चर्चेत राहिलेला आहे. दरवेळी पोषण आहार प्रकरणी नवनवीन घोळ समोर येतो. पुन्हा शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार आणि पोषण आहारातील घोळ समोर आला आहे. दुष्काळी परिस्थितीत उन्हाळ्याच्या सुटीतही शाळेतील मुलांना पोषण आहार शिजवून देण्याचा आदेश देण्यात आले होते. परंतु, उन्हाळ्याच्या सुटीत शाळेत पोषण आहार खाण्यासाठी विद्यार्थीच येत नसल्याची स्थिती जिल्ह्यातील शाळांमध्ये पाहण्यास मिळत होत्या. ही परिस्थिती असताना देखील सुटीच्या दीड महिन्याच्या 1 कोटी 83 लाख रूपयांचा धान्यादी माल ’फस्त’ झाला असून सदर झालेल्या बिलांवरून हा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.
खिचडी कोणी खाल्ली?
गेल्या वर्षी पाऊस झाला नसल्याने राज्यात सर्वत्र दुष्काळी परिस्थिती होती. दुष्काळाच्या झळा ग्रामीण भागात अधिक असल्याने सुटीच्या कालावधीत शाळांमध्ये पोषण आहार शिजविण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. याकरीता शाळांमधील शिक्षकांच्या ड्युटी देखील लावण्यात आली होती. म्हणजेच रोज सकाळी शाळेत जावून येणार्या विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्याचे काम शिक्षकांना करावे लागणार होते. परंतु, कडक उन्हात पोषण आहार खाण्यासाठी विद्यार्थीच उपस्थित राहत नव्हते. याबाबत स्वत: शिक्षकांनी तक्रार केलेल्या आहे. यामुळे पोषण आहार कोणासाठी शिजवला जायचा? हा यक्ष प्रश्न आहे. पण विद्यार्थी नसताना पोषण आहार शिजला नसताला 1 कोटी 83 लाख रूपयांचे बिल कसे सादर झाले? हा प्रश्न देखील सध्या उपस्थित झाला आहे.
कागदोपत्री विद्यार्थ्यांची खोटी पटसंख्या
आहार शिजविण्याच्या नावाखाली आणि शाळेत खोटी पटसंख्या दाखवून न शिजविलेला आहार कागदावर आला. अर्थात कागदोपत्री विद्यार्थ्यांची पटसंख्या दाखवून आणि आहार शिजविल्याचे दाखविण्यात आला. यामुळेच इतक्या मोठ्या प्रमाणात बिल सादर झाले आहे. बिलांची पडताळणी म्हणून प्रत्येक तालुक्यातून दहा टक्के शाळांची पावती तपासणी करण्यात आली आहे. शालेय पोषण आहार योजनेतंर्गत जिल्ह्यात 2 हजार 754 शाळांचा समावेश आहे. या शाळांमध्ये पुरवठा होणार्या धान्यादी मालाचे बिल साधारण तीन ते साडेतीन कोटी दरम्यान होत असते. परंतु उन्हाळी दीड महिन्याच्या सुटीत नियमित बिलांपेक्षा जास्तीचा पोषण आहार फस्त झाल्याचे बिलांवरून उघड होत आहे. कारण एप्रिल आणि मे महिन्याच्या बिल 1 कोटी 83 लाख आले आहे. तर जुन व जुलै या दोन महिन्याचे बिल सव्वातीन कोटी रूपये आले आहे.