मुंबई : मराठा समाज किंवा मराठा क्रांती मोर्चातर्फे कुठलाही बंद नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. मराठा समाजाच्या वतीने 10 जानेवारी रोजी महाराष्ट्र बंद अशा आशयाची एक पोस्ट गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र मराठा क्रांती मोर्चाकडून कोणताही बंद पुकारण्यात आला नसल्याचे मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा समाज यांनी स्पष्ट केले आहे. तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाज हे समाजाचे व्यासपीठ आहे. सकल मराठा समाज मराठा क्रांती मोर्चाची कोणतीही अधिकृत बैठक झालेली नाही, आणि कोणीही मराठा सामाजाच्या नावावर मराठा क्रांती मोर्चा किंवा सकल मराठा समाजाने बंद पुकारलेला नाही असे समन्वयक विनोद लक्ष्मण पोखरकर यांनी सांगितले आहे.
काही ठिकाणी स्थानिक पातळीवर निर्णय
1 जानेवारी रोजी झालेल्या हिंसाचारात एक मराठा भावाला आपला जीव गमवावा लागला. तसेच 2 जानेवारी रोजी प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या महाराष्ट्र बंदमध्ये अनेक ठिकाणी खासगी मालमत्तेचे नुकसान केले गेले आहे व काही ठिकाणी मराठा बांधवांवर अॅट्रॉसिटीसह इतर कलमांतर्गत गुन्हे दाखल केले गेले आहेत. याच्या निषेधार्थ काही ठिकाणी स्थानिक पातळीवर निर्णय घेऊन विभागीय बंद ठेवण्यात आले असून महाराष्ट्र बंद बाबत असा कुठलाही निर्णय झालेला नाही आणि असा कुठलाही बंद ठेवला जाणार नाही असे विनोद लक्ष्मण पोखरकर यांनी सांगितले.
आरक्षण, संरक्षण, शिक्षण, नोकरी द्या
मराठा समाजातील तरूणांचा वापर करून राजकारण करून मराठा दलित वाद लावू पाहणार्यांच्या कटकारस्थानाला कोणीही बळी पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे. मराठा समाजाला उतरवून मराठ्यांनाच टार्गेट करून जातीय तेढ निर्माण करून मराठ्यांची चळवळ मोडीत काढून मराठ्यांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न हानून पाडा. मराठा समाजाला आपल्या मागण्यांकडे लक्ष देणे गरजेच आहे. हिंसाचारापेक्षा आमच्या मुलांना आरक्षण, संरक्षण, शिक्षण, नोकरी, उद्योग, व्यवसायाकडे लक्ष देणे गरजेच आहे, तसेच कोणीही या अफवांवर विश्वास ठेवू नये असे सांगण्यात आले आहे. मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा क्रांती मोर्चाचे नाव घेऊन कोणत्याही पक्ष संघटनेने दिशाभूल करू नये, अन्यथा अशा लोकांवर गुन्हे दाखल करण्यात येतील याची नोंद घ्यावी असा इशारा देण्यात आलेला आहे.